(बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक प्रश्नांवर सखोल चर्चा; संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय )
चंदगड/प्रतिनिधी : बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या बहुजन क्रांती सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच तांबुळवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत समाजासमोरील विविध ज्वलंत प्रश्नांवर सखोल विचारमंथन करण्यात आले तसेच संघटनेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. गुंडुराव कांबळे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी बहुजन समाजातील युवक, महिला आणि सर्व घटकांनी संघटित होऊन सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त केली. समाजातील दुर्बल घटकांना न्याय, शिक्षण आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटित शक्ती उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीचे प्रास्ताविक बहुजन संघटक पी. डी. सरवदे यांनी केले. त्यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी वाढती बेरोजगारी, महागाई, शिक्षणातील विषमता, युवकांसमोरील आव्हाने, सामाजिक न्याय आणि बहुजन समाजाची एकजूट या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीस ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी शिक्षण, जागृती आणि संघटन या माध्यमातून समाजातील बदल घडवून आणण्याचे महत्त्व विशद केले. युवकांनी स्पर्धात्मक युगात स्वतःला सक्षम बनवून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत संघटनेचा विस्तार गावोगावी करण्याबरोबरच युवक व महिलांना संघटनेच्या कार्यात अधिक सक्रियपणे सहभागी करून घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच सामाजिक प्रश्नांवर लोकशाही मार्गाने लढा उभारणे, जनजागृती अभियान राबविणे आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे,लखन कांबळे, पांडुरंग कांबळे बुजवडेकर, शाहीर मधुकर कांबळे, श्रावण कांबळे, बबन माने तेऊरवाडी, सुधीर कांबळे कोवाड, कलाप्पा कांबळे कालकुंद्री, संतोष कांबळे, रवींद्र कांबळे, गौतम कांबळे,राजेंद्र कांबळे दाटे राजू कांबळे शिरगाव, एकनाथ पाटील तेऊरवाडी यांच्यासह चंदगड तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या बैठकीमुळे बहुजन समाजाच्या संघटनात्मक बळकटीकरणाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments