करवीर प्रतिनिधी : भुयेवाडी येथील 'शेती वाचवा अभियानांतर्गत' (RAWE - Rural Agricultural Work Experience) अंतर्गत गावामध्ये जोडलेल्या कृषीकन्यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची भव्य जनजागृती रॅली आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे दि. २२ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले तज्ज्ञ व्याख्यान. याप्रसंगी मुंबई येथील ICAR-CIRCOT मुंबईचे नामवंत शास्त्रज्ञ डॉ. मनोज पुनिया यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.डॉ. पुनिया यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रामुख्याने संतुलित खत व्यवस्थापन , माती परीक्षण चे महत्त्व, नैसर्गिक शेती आणि शाश्वत शेती तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली.
बदलत्या हवामानाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालत शेतीमध्ये 'कृत्रिम बुद्धिमत्ता' म्हणजेच 'एआय फार्मिंग' चा वापर कसा करता येईल, यावर त्यांनी विशेष भर दिला. रासायनिक खतांचा अतिवापर टाळून जमिनीची सुपीकता कशी टिकवावी, याबाबत त्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच दुसऱ्या दिवशी कृषीकन्यांनी भुयेवाडी येथील कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली आयोजित केली.
या अभियानाचा एक भाग म्हणून कन्या विद्या मंदिर, भुयेवाडी येथील विद्यार्थिनींची एक भव्य रॅली काढण्यात आली. "रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करा", "शाश्वत शेती अंगीकारा" आणि "नैसर्गिक शेती काळाची गरज" अशा घोषणा देत विद्यार्थिनींनी संपूर्ण गावात पर्यावरणपूरक शेतीचा संदेश दिला. या रॅलीच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये शेती वाचवण्याबाबत मोठी जनजागृती निर्माण झाली.
या कार्यक्रमासाठी गावातील प्रगतशील शेतकरी, ग्रामस्थ,विद्या मंदिरचे शिक्षक वृंद आणि कृषीकन्या यांच्या उपक्रमाचे संपूर्ण गावातून कौतुक होत आहे.हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. शेलार, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे व कार्यक्रम अधिकारी प्रा. श्वेता मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. ग्रामपंचायत, ग्रामसंघटना आणि गावातील नागरिकांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला.


Post a Comment
0 Comments