प्रभारी व्यवस्थेवरून सभापती विलास नाईक आक्रमक!
चंदगड : भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि निसर्गसंपन्न असलेल्या चंदगड तालुक्याला सध्या प्रशासकीय अनास्थेचे मोठे ग्रहण लागले आहे. तालुक्यातील विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जनतेची दैनंदिन कामे पूर्णपणे कोलमडली असून, दोन-तीन ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांमुळे प्रशासनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. चंदगडला तात्काळ कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करावेत, अशी ठाम आणि आक्रमक मागणी पंचायत समितीचे सभापती विलास दत्तात्रय नाईक यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. प्रशासनाचे हे जाणीवपूर्वक चाललेले दुर्लक्ष आता कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
चंदगड तालुक्यात एखाद्या विभागातील अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर नवीन अधिकारी रुजू होण्यासाठी बराच कालावधी लागतो. अनेकदा तर अधिकाऱ्याची रीतसर नियुक्ती झाल्यानंतरही राजकीय दबावामुळे ती रद्द केली जाते आणि अधिकारी दुसरीकडे निघून जातात. राजकीय दबावाच्या या खेळात चंदगड तालुक्याचे अतोनात नुकसान होत असल्याचे सांगत सभापती नाईक यांनी पंचायत समिती विभागात तब्बल २४६ पदे रिक्त असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या या तालुक्यात विकासकामे ठप्प झाली असून, प्रभारी व्यवस्थेऐवजी प्रत्येक विभागात कायमस्वरूपी सक्षम अधिकारी देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नियुक्ती झाल्यानंतर काही अधिकारी व कर्मचारी चंदगड येथे रुजू होण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात, याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला. नोकरीसारखा गंभीर प्रश्न असताना मिळालेली नियुक्ती स्वीकारण्यास टाळाटाळ होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. चंदगड तालुका हा निसर्गसंपन्न आणि विकासाच्या मोठ्या संधी असलेला तालुका असून तो वाईट नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच चंदगडमध्ये नियुक्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसोबत सकारात्मक भूमिका घेऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विशेषतः चंदगड तालुक्यामध्ये शिक्षण विभागात बहुतांशी पदे रिक्त असल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. चंदगड तालुका हा मागास व दुर्गम म्हणून संबोधला जातो, मात्र नेमका याच गोष्टीचा फायदा घेत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नाईक यांनी केला. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला.या महत्त्वाच्या बैठकी प्रसंगी उपसभापती संज्योती मळवीकर, पंचायत समिती सदस्य मनस्विनी कांबळे, प्रेमा हुलजी,सुवर्णा कुंभार,पांडुरंग बेनके,मधुकर आंबेवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनीही या मागणीला भक्कम पाठिंबा दिला.

Post a Comment
0 Comments