Type Here to Get Search Results !

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऍड.संतोष मळविकर दिल्लीत दाखल


चंदगड | प्रतिनिधी : सामाजिक कार्यकर्ते व ऍड.संतोष मळविकर हे समाजसेवक व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दिल्लीकडे रवाना झाले.यावेळी बोलताना ऍड.मळविकर म्हणाले की, देशातील लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम करणाऱ्या शैक्षणिक प्रश्नांबाबत सरकारने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाशी ऐक्य व्यक्त करण्यासाठी आपण प्रत्यक्ष सहभागी होत आहोत.


ऍड.मळविकर यांनी यापूर्वीही अनेक राष्ट्रीय आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आहे. सन २०११ मध्ये जनलोकपाल विधेयकासाठी जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनात त्यांनी सलग पाच दिवस प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. त्या काळात त्यांनी अरविंद केजरीवाल, किरण बेदी, स्वामी अग्निवेश यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्त्यांसोबत काम केले. तसेच योगगुरू स्वामी रामदेव यांच्या आंदोलनातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता.


यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, देशातील तरुणांनी लोकशाही मार्गाने, संविधानिक चौकटीत राहून अन्यायाविरुद्ध संघटितपणे आवाज उठवण्याची गरज आहे. बदल घडविण्याची सर्वात मोठी ताकद युवकांमध्ये असून, सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांवर देशभरातील युवकांनी एकत्र येणे आवश्यक आहे.20 तारखेला होणाऱ्या आंदोलनात आपण सहभागी होणार असून, दिल्लीहून परतल्यानंतर चंदगड तालुका व कोल्हापूर जिल्ह्यात विविध सामाजिक प्रश्नांवर युवकांना सोबत घेऊन व्यापक जनआंदोलने उभारण्याचा मानस असल्याचेही ऍड.संतोष मळविकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments