कोरज येथील भाग्यलक्ष्मी पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; एसपींकडे संरक्षणाची मागणी
चंदगड : चंदगड तालुक्यातील कोरज येथील भाग्यलक्ष्मी पतसंस्थेच्या इमारत बांधकाम व्यवहारातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा जाब विचारणारे संस्थेचे संस्थापक, अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे सदस्य, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे चंदगड तालुका अध्यक्ष तसेच विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय असलेले बापूसाहेब शिरगावकर यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक (एसपी) यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनानुसार, भाग्यलक्ष्मी पतसंस्थेच्या इमारत बांधकाम व्यवहारातील कथित आर्थिक घोटाळ्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यामुळे संस्थेचे सचिव सुनील यशवंत खरुजकर यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांसमोरच शिरगावकर यांच्यावर धावून जात खुर्ची उगारून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी चेअरमन तानाजी बेरडे, सचिव सुनील खरुजकर तसेच अन्य दोन संचालक यांनी तब्बल ४२ वेळा बैठकीसाठी संपर्क साधल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. सभेच्या आदल्या दिवशी नागणवाडी येथे झालेल्या बैठकीतही पुन्हा खुर्ची घेऊन अंगावर धावून मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले असून, या घटनेचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.
शिरगावकर यांनी या संदर्भात चंदगड पोलिसांत तक्रार दाखल केली असतानाही संबंधितांवर प्रभावी कारवाई झाली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. उलट त्यानंतर चंदगड व नागणवाडी बाजारपेठेत चार वेळा अडविण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आपल्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवेदनात, "शिरगावकर यांच्या जीवितास काहीही धोका अथवा अनुचित घटना घडल्यास संबंधित सचिवासह संस्थेतील कथित अपहाराला पाठबळ देणारे चेअरमन व संबंधित संचालक यांना जबाबदार धरावे," अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच शिरगावकर यांना आवश्यक पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने केली आहे.
पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य मुख्य कार्याध्यक्ष धीरज रुकडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कयेश पोवार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर मांडवकर, जिल्हा कृषी संघटक भगवान जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, चंदगड तालुका अध्यक्ष बापूसाहेब शिरगावकर, तालुका सचिव सुरेश दळवी, नागणवाडी विभाग प्रमुख विलासकुमार विझनेकर, हलकर्णी विभाग प्रमुख मनोज कांबळे यांच्यासह तालुका समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments