Type Here to Get Search Results !

ताटातूट झालेल्या बहीण-भावाची घडवली भेट; हवालदार जमीर मकानदार यांची कौतुकास्पद कामगिरी!




चंदगड : 'सदरक्षणाय खलनिग्रहाय' या पोलीस दलाच्या ब्रीदवाक्याचा प्रत्यय आणत, एका कर्तव्यदक्ष पोलीस हवालदाराने दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे आणि तत्परतेमुळे तब्बल १५ दिवसांपासून ताटातूट झालेल्या भाऊ-बहिणीची अखेर जिल्हा रुग्णालयात हृदयस्पर्शी भेट झाली. उत्तूर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार जमीर मकानदार (बक्कल नं. ७९१) यांच्या या मानवतावादी आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की,रविवार (ता. १९) रोजी सकाळी उत्तूरच्या पश्चिम भागात असलेल्या वडकशिवाले (ता. आजरा) या गावात एक अनोळखी महिला आढळून आली. ही महिला तेलगू, मराठी आणि हिंदी अशा विविध भाषांमध्ये संमिश्र बोलत होती. ती व्यवस्थित बोलत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क लढवले जात होते.थंडीने कुडकुडणारी, अंगावर अपुरे वस्त्र आणि सततच्या चालण्यामुळे पायाला झालेल्या जखमा अशा हलाखीच्या स्थितीत असलेल्या या महिलेला पाहून ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस पाटील सुरेखा दिवटे व सुनील दिवटे यांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने उत्तूर पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस हवालदार जमीर मकानदार हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.


सुरुवातीला ही महिला विस्कळीत व अपुरे बोलत असल्याने तिची ओळख पटवणे किंवा मूळ पत्ता शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, हवालदार मकानदार यांनी पोलिसिंगच्या पुढचे पाऊल टाकत तिला प्रेमाने खाऊ-पिऊ घातले, धीर दिला आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.


वैद्यकीय उपचारादरम्यान डॉक्टरांच्या मदतीने आणि हवालदार मकानदार यांनी घेतलेल्या अथक शोधातून ती महिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील असल्याचे समोर आले. मकानदार यांनी लागलीच दोडामार्ग येथील आपल्या सहकाऱ्यांशी आणि मित्रांशी संपर्क साधत त्या महिलेचा फोटो व माहिती पाठवली. त्यावरून तिचे नाव सीमा उमेश परब (रा. आडळी, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) असल्याचे निष्पन्न झाले. मानसिक धक्क्यामुळे सीमा या घरून निघून गेल्या आणि गेल्या १५ दिवसांपासून रानावनात भरकटत होत्या.


पोलिसांनी तत्काळ सीमा यांच्याशी संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधत त्यांचे बंधू सुहास यांना याची माहिती दिली आणि त्यांना जिल्हा रुग्णालयात बोलावून घेतले. रुग्णालयात जेव्हा १५ दिवसांनंतर बहीण-भावाची भेट झाली, तेव्हा उपस्थितांचेही डोळे पाणावले. सीमा यांच्यावर योग्य वेळी उपचार मिळाल्याने आणि त्यांची कुटुंबीयांशी भेट घडल्याने, या दुःखाच्या प्रसंगातून सावरलेल्या कुटुंबाने पोलिसांचे आणि विशेषतः हवालदार जमीर मकानदार यांचे मनापासून आभार मानले.


पोलीस हवालदार जमीर मकानदार हे यापूर्वी चंदगड पोलीस ठाण्यांतर्गत कोवाड बीट येथे दीर्घकाळ कार्यरत होते. नुकतीच त्यांची आजरा पोलीस ठाण्यांतर्गत उत्तूर आऊटपोस्ट बीट येथे बदली झाली आहे.आपल्या सेवाकाळात उत्तम जनसंपर्क आणि प्रामाणिक काम करण्याच्या शैलीमुळे ते नेहमीच एक 'डॅशिंग आणि कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार' म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी अनेक प्रसंगी गोरगरीब व गरजू जनसामान्यांना मदतीचा हात देत माणुसकीचे अनेक दाखले दिले आहेत. खाकी वर्दीतील त्यांच्या याच संवेदनशील स्वभावामुळे आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments