सरकारी जमिनीवरील काजू बागायतदारांना नुकसानभरपाई द्या
वारसा बदलात अडचणी आलेला नुकसानग्रस्त शेतकरी वंचित
म्हाळुंगेतील तुकाराम पाटील व ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
चंदगड प्रतिनिधी : खालसा म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील सरकारी जमिनीवर काजूची लागवड करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना सन २०२६ मधील काजू नुकसानीची भरपाई मिळावी, तसेच संबंधित जमिनीचा मालकी हक्क शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी तुकाराम पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
म्हाळुंगे गावातील विविध सर्वे क्रमांकांमध्ये सुमारे ७०० एकर सरकारी जमिनीवर काजूची झाडे लावण्यात आली आहेत. या बागायतीतून मिळणारे उत्पन्न अनेक शेतकरी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. अनेक वर्षांपासून शेतकरी या जमिनीवर काजूसह ऊस, भात, रताळी, नाचणी आदी पिकांची लागवड करीत आहेत.
मात्र, जमीन सरकारी असल्याने संबंधित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ मिळत नाही. पीक कर्ज, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती तसेच वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यातही अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सन २०२६ मध्ये झालेल्या काजू नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या जमिनीच्या मालकी हक्काच्या प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, चंदगडचे आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
त्यांचंप्रकारे गेल्या एक-दोन वर्षामध्ये वारसा बदल करण्यासाठी दिलेल्या शेतकऱ्यांना काही तांत्रिक त्रुटीमुळे नाव बदल झाले नाहीत.त्यामुळे अश्या शेतकऱ्यांना किसान कार्ड व उतारे त्यांच्या नावे न मिळाल्यामुळे मोठा फटका बसला आहे. किंबहुना या नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागत आहे.त्यामुळे नुकसानभरपाई मुदत वाढावी अशीही मागणी होतं आहे.


Post a Comment
0 Comments