Type Here to Get Search Results !

विद्यार्थिनीच्या कर्तृत्वाला सन्मान; सभापती प्रा. विलास नाईक यांचा कौतुकास्पद निर्णय

चंदगड /राजेंद्र शिवणगेकर : मराठी विद्यामंदिर, महिपाळगड येथील विद्यार्थिनी शिवानी सावंत हिने इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवा आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा झेंडा राज्याच्या पटलावर फडकविला. तिच्या या अभिमानास्पद यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असतानाच चंदगड पंचायत समितीचे विद्यमान सभापती प्रा. विलास नाईक यांनी घेतलेला एक निर्णय विशेष कौतुकाचा विषय ठरला आहे.


पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच सभापती म्हणून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंचायत समितीच्या आवारात ध्वजारोहण करण्याचा मिळालेला मान प्रा. विलास नाईक यांनी स्वतःकडे न ठेवता गुणवंत विद्यार्थिनी शिवानी सावंत हिला देण्याचा निर्णय घेतला. आपल्या पदाचा मान स्वतः उपभोगण्याऐवजी तालुक्याचे नाव उज्वल करणाऱ्या विद्यार्थिनीच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याची त्यांची भूमिका ही खऱ्या अर्थाने मोठेपणाची आणि प्रेरणादायी ठरली आहे.


शिवानीने मिळविलेले यश हे केवळ तिच्या कुटुंबाचे किंवा शाळेचे यश नसून संपूर्ण चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे तिच्या हातून पंचायत समितीच्या ध्वजारोहणाचा मान करून देत प्रा. नाईक यांनी गुणवत्तेला आणि विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सर्वोच्च स्थान दिले आहे.


आजच्या काळात पद, प्रतिष्ठा आणि अधिकार यांना अधिक महत्त्व दिले जात असताना, ‘मान मिळाला तर तो स्वतःसाठी नव्हे, तर कर्तृत्ववान व्यक्तीच्या सन्मानासाठी वापरायचा’ हा संदेश प्रा. विलास नाईक यांच्या निर्णयातून मिळतो. त्यांच्या या निर्णयाचे पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.




गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सार्वजनिक सन्मान करणारा हा उपक्रम इतरांसाठीही आदर्श ठरणारा आहे. शिवानी सावंतच्या यशाला ध्वजारोहणाचा मान देऊन सलाम करणारे सभापती प्रा. विलास नाईक यांचे हे पाऊल चंदगडच्या सामाजिक व शैक्षणिक वाटचालीतील एक सकारात्मक आणि अनुकरणीय उदाहरण ठरले आहे.

Post a Comment

0 Comments