चंदगड प्रतिनिधी : पाटणे वनपरिक्षेत्रातील खा. म्हाळुंगे येथील मलगड परिसरात वन्यजीवांची शिकार करून त्यांचे मांस शिजविले जात असल्याची धक्कादायक घटना वनविभागाच्या रात्रीच्या गस्तीमध्ये उघडकीस आली. वनविभागाच्या पथकाने कारवाई करत जिवंत कासव तसेच साळींदराची शिकार केल्याचे पुरावे आणि सुमारे १ लाख ९८ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघे फरार आहेत.
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनपाल तुडीये व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाटणे वनपरिक्षेत्रात रात्रीची गस्त सुरू केली होती. यावेळी खा. म्हाळुंगे येथील मलगड या ठिकाणी असलेल्या एका घरात वन्यजीवांशी संबंधित संशयास्पद हालचाली आढळून आल्या. पथकाने तेथे छापा टाकला असता जिवंत कासव पकडून ठेवलेले असल्याचे, तसेच साळींदराची शिकार करून त्याची साफसफाई व कापाकापी करून ठरावीक मांस शिजविले जात असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी पुंडलिक निंगाप्पा गुरव (वय ४६, सध्या रा. खा. म्हाळुंगे-मलगड, मूळ रा. गोल्याळी, ता. खानापूर, जि. बेळगाव), देवाप्पा बाबू कुलम (वय ३४), रामलिंग धोंडीबा गवस (वय ३९) आणि तुकाराम शंकर गावडे (वय ४०), सर्व रा. गोल्याळी, ता. खानापूर, जि. बेळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान यातील दोघे आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.जागेवरून १ लाख ९८ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील संबंधित कलमांनुसार वनरक्षक म्हाळुंगे यांनी प्र.गु.रि. WL ०१/२०२६, दि. २६ ऑगस्ट २०२६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
वन्यजीवांची शिकार, त्यांचे मांस बाळगणे किंवा सेवन करणे हा केवळ कायद्याचा भंग नसून जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारा प्रकार आहे. जंगलातील प्रत्येक जीव हा पर्यावरणीय साखळीचा महत्त्वाचा घटक असल्याने अशा प्रकारच्या शिकारीला आळा घालण्यासाठी वनविभागाने गस्त आणि कारवाई अधिक तीव्र करण्याची गरज आहे. नागरिकांनीही वन्यजीवांबाबत संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक कोल्हापूर धैर्यशिल पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणे वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. वनपाल वर्षदा पावसकर, जॉन्सन डिसोजा, बाळासाहेब भांडकोळी तसेच वनरक्षक श्रेयश रायके, खंडू कातखडे, मेघराज हुल्ले, गणेश भालेराव, कुणाल राऊत, विशाखा बास्कर, मृणाल गायकवाड, शशिकांत शिंदे, मोनाप्पा मुतकेकर, पास्कल डिसोजा, अमित माने, वाहनचालक शुभम बांदेकर, विश्वनाथ नार्वेकर तसेच हाजगोळी वन्यजीव बचाव पथकातील कृष्णा मुळीक व राजू पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.फरार आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.

Post a Comment
0 Comments