सापांविषयीच्या अंधश्रद्धांना छेद देत जनजागृती करणारे संस्थापक सत्यशोधक आद्यसर्पमित्र स्वर्गीय बाबुराव टक्केकर आणि नागपंचमी यांवर सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी महाराष्ट्र माझा 24 न्युजचॅनेलवर आपली प्रतिक्रिया मांडली!
कोल्हापूर : भारतीय संस्कृतीत नागपंचमीचा सण मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला जातो. एका बाजूला सापांची पूजा केली जात असतानाच, दुसरीकडे समाजात सापांबद्दल आजही अनेक गैरसमज आणि भीती पसरलेली असते. मात्र, वन्यजीव कायद्याच्या (१९७२) खूप आधीपासून, म्हणजेच १९६६ पासून सातत्यपूर्ण उपक्रम राबवून सापांविषयी शास्त्रीय माहिती देणारे आणि लोकांच्या मनातील भीती दूर करणारे संस्थापक सत्यशोधक आद्यसर्पमित्र स्वर्गीय बाबुराव टक्केकर हे महाराष्ट्रातील एक दीपस्तंभ ठरले आहेत.
गावाच्या विकासासाठी सरकारी नोकरीचा त्याग आणि बहुआयामी उपक्रम :
ढोलगरवाडी (तालुका चंदगड) या गावाचा विकास व्हावा यासाठी संस्थापक सत्यशोधक आद्यसर्पमित्र स्वर्गीय बाबुराव टक्केकर यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी गावात शाळा सुरू केली. या शाळेच्या माध्यमातून त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर विद्यार्थ्यांना पोहायला शिकवणे, गावात बाजार भरवणे, श्रमदान शिबिर, शिवणकाम प्रशिक्षण असे अनेक समाजोपयोगी आणि कौशल्यविकास उपक्रम यशस्वीपणे राबवले. २५ नोव्हेंबर २०१६ रोजी ते आम्हा सर्वांना सोडून अनंतात विलीन झाले.
"दूध नाही, उंदीर-बेडूक हे सापांचे खाद्य"
पूर्वी नागपंचमीला सापांना दूध पाजण्याची चुकीची प्रथा मोठ्या प्रमाणावर पाळली जायची. अशा अंधश्रद्धांना फाटा देत टक्केकर सरांनी, "सापाचे खाद्य दूध नव्हे, तर उंदीर आणि बेडूक हे आहे" हे वैज्ञानिक सत्य लोकांपर्यंत पोहोचवले. सापांबद्दलची ही शास्त्रीय भूमिका रुजवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला.
चार विषारी साप आणि इतर सर्व बिनविषारी!
लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी त्यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. आपल्या परिसरात आढळणाऱ्या सापांपैकी केवळ चार साप विषारी आहेत, बाकी सर्व बिनविषारी असतात, हे त्यांनी पटवून दिले:
चार विषारी साप: नाग, मन्यार, घोणस आणि फुरसे.
संस्थेची प्रेरणादायी ब्रीदवाक्ये
टक्केकर सरांच्या संस्थेने नेहमीच लोकशिक्षणाला प्राधान्य दिले.
"साप शेतकऱ्यांचे मित्र आहेत" आणि "साप ही राष्ट्रीय संपत्ती आहे"
ही दोन महत्त्वाची ब्रीदवाक्ये त्यांनी जनमानसात रुजवली. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांना फस्त करून साप शेतीचे रक्षण कसे करतात, हे त्यांनी दाखवून दिले. तसेच, साप चावल्यानंतर तातडीने करायचे प्राथमिक उपचार (First Aid) कोणकोणते आहेत, याचे मार्गदर्शनही त्यांनी हजारो नागरिकांना दिले.
राष्ट्रीय स्तरावर दखल, भारतातील एकमेव 'सर्प शाळा' आणि स्नेक पार्कसाठी सुरू असलेले प्रयत्न
संस्थापक सत्यशोधक आद्यसर्पमित्र स्वर्गीय बाबुराव टक्केकर यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र झू अथॉरिटी (नागपूर) आणि सेंट्रल झू अथॉरिटी (दिल्ली) यांनी घेतली आहे.
भारतात इतरत्र कुठेही सापडणार नाही, अशी अनोखी 'सर्पशाळा' येथे चालवली जाते. या शाळेमध्ये इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना सापांच्या जीवनचक्रविषयी आणि त्यांच्या शास्त्रीय स्वभावाविषयी मोलाचे शिक्षण दिले जाते.
सध्या या कार्याला आणि परंपरेला अधिकृत मान्यता मिळण्यासाठी सरांचे बंधू तानाजी वाघमारे साहेब प्रयत्नशील आहेत. ढोलगरवाडी येथे स्नेक पार्कला अधिकृत मान्यता मिळावी यासाठी त्यांनी सेंट्रल झू अथॉरिटी (दिल्ली) आणि महाराष्ट्र झू अथॉरिटी (नागपूर) यांच्याकडे ई-मेलद्वारे आणि प्रत्यक्षात भेट देऊन सतत पाठपुरावा चालवला आहे. तसेच, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शिवाजीराव पाटील साहेब हेदेखील ढोलगरवाडी येथे स्नेक पार्क मिळावे यासाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहेत.
तानाजी वाघमारे साहेबांचे म्हणणे आहे की, "ज्याप्रमाणे शिराळा येथे परमिशन दिली जाते, त्याचप्रमाणे आमचे सुद्धा गेली ६० वर्षे स्नेक पार्क आणि सर्पशाळेचे कार्य अविरत चालू आहे. ही ६० वर्षांची समृद्ध परंपरा अशीच सुरू राहावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत." यंदाच्या नागपंचमीनिमित्त, सापांना मारण्याऐवजी त्यांचे रक्षण करण्याचा आणि संस्थापक सत्यशोधक आद्यसर्पमित्र स्वर्गीय बाबुराव टक्केकर सर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूया!


Post a Comment
0 Comments