इनाम म्हाळुंगे येथे हवालदार नामदेव गावडे यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप; ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमला परिसर
चंदगड : देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अमृतसर, पंजाब येथे निधन झालेले इनाम म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील सैन्यदलातील जवान हवालदार नामदेव आनंदा गावडे (वय ३८) यांच्यावर आज रविवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा यश याने वडिलांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांनी साश्रूनयनांनी देशसेवक जवानाला अखेरचा निरोप दिला.हवालदार नामदेव गावडे यांचे गुरुवारी (दि. २०) अमृतसर येथे निधन झाले होते. अमृतसर येथून विमानाने त्यांचे पार्थिव पुणे येथे आणण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे आज इनाम म्हाळुंगे येथे आणण्यात आले.
दुपारी दोन वाजल्यापासून गावातून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. ट्रॅक्टर-ट्रॉली आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. गावातील प्रत्येक घरासमोर पार्थिवाचे औक्षण करून ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली. ‘नामदेव गावडे अमर रहे’, ‘भारत माता की जय’ अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आपल्या गावातील जवानाने देशासाठी दिलेल्या बलिदानाबद्दल ग्रामस्थांच्या मनात अभिमान आणि दुःखाची भावना एकाच वेळी दिसून येत होती.
सैन्यदलात कार्यरत राहून देशाच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावत असलेल्या हवालदार गावडे यांच्या निधनाने संपूर्ण चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांचे योगदान आणि त्याग किती मोठा असतो, याची जाणीव करून देणारा हा प्रसंग ठरला. देशसेवेत असताना प्राण गमावलेल्या या वीर जवानाला ग्रामस्थांनी राष्ट्रभक्तीच्या वातावरणात अखेरचा निरोप दिला.यावेळी गोपाळराव पाटील, सभापती विलास पाटील, निखिल पाटील, भारती पाटील, नामदेव पाटील, सचिन बल्लाळ, मनस्वी कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून हवालदार नामदेव गावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
हवालदार नामदेव गावडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले आहे.देशासाठी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या हवालदार नामदेव गावडे यांचे बलिदान चंदगडच्या मातीत आणि ग्रामस्थांच्या स्मरणात सदैव जिवंत राहील. त्यांच्या त्यागातून देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळत राहील.


Post a Comment
0 Comments