मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे व प्रवासी वाहतुकीच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मुंबई येथील ‘सुरुची’ शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
संघाचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत निकम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत कोल्हापूर-मुंबई प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करावी, तसेच कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस नियमितपणे सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्णत्वास नेण्याबरोबरच कोल्हापूर-चंदगड-बेळगाव, कोल्हापूर-वैभववाडी आणि सावंतवाडी-चंदगड-बेळगाव या प्रस्तावित रेल्वेमार्गांच्या कामांना प्रत्यक्ष गती देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. केवळ निवेदने, बैठका आणि आश्वासनांपुरते प्रश्न न ठेवता निश्चित मुदतीत प्रत्यक्ष निर्णय व अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका संघटनेने मांडली.
गणेशोत्सवासाठी जादा एसटी बसची मागणी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने कोल्हापूरकर आपल्या गावी येणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी अतिरिक्त एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी संघटनेने पालकमंत्र्यांकडे केली.या मागणीची दखल घेत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी परिवहन मंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून गणेशोत्सव काळात कोल्हापूरसाठी अतिरिक्त एसटी बसेस उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेने सांगितले.
गणपती, दसरा, दिवाळीसाठी अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी
गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या काळात कोल्हापूरकडे प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या सणांच्या कालावधीत कोल्हापूरसाठी अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.या संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी आपल्या पी.ए. व सहाय्यकांना दिल्या असून, मंगळवारपर्यंत बैठक निश्चित करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
‘फाईल नको, प्रत्यक्ष रेल्वे सुविधा हवी’
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रश्नांबाबत निवेदने, पत्रव्यवहार आणि बैठका होत आहेत. मात्र अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने ‘निवेदन स्वीकारून फाईलला लावणे पुरे झाले; आता ठोस निर्णय हवा’, अशी आक्रमक भूमिका संघटनेने मांडली.कोल्हापूरच्या जनतेला फाईल क्रमांक नव्हे तर रेल्वे गाडी, आश्वासन नव्हे तर निश्चित तारीख आणि बैठकीचे फोटो नव्हे तर लेखी निर्णय हवा, असे अॅड. चंद्रकांत निकम यांनी स्पष्ट केले.
रेल्वे प्रश्न हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नसून कोल्हापूरच्या विकासाशी संबंधित असल्याने खासदार, आमदार, पालकमंत्री आणि सर्व राजकीय पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाने पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे पाठपुरावा करावा, असे आवाहनही संघटनेने केले.या बैठकीस संघाचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत निकम यांच्यासह वसंत पुरी बुवा, सतीश मिस्त्री, गडहिंग्लज तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष उदय पुजारी, सुहास शिंदे, संजय पारदे आणि देऊळवाडीचे प्रकाश शेडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रेल्वे व परिवहन विभागाशी तातडीने चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याची सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
“आश्वासन नको, लेखी निर्णय हवा; निर्णय नको, प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी,” अशी भूमिका घेत कोल्हापूरच्या रेल्वे हक्कासाठीचा संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments