पुणे : कोथरूड परिसरात १७ वर्षीय मुलाचा लोखंडी हत्याराने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोन १८ वर्षीय तरुणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, संबंधित १७ वर्षीय मुलगा आणि आरोपी तरुण एकमेकांचे मित्र होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात काही कारणावरून वाद असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दि. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास संबंधित मुलाला आरोपी तरुणांनी सोबत नेल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांनी मुलाचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. याबाबत कोथरूड पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांच्या तपासादरम्यान संबंधित मुलाला एसआरए टेकडी परिसरातील कंपनीच्या बाहेरील गेटजवळील निर्जनस्थळी नेऊन लोखंडी हत्याराने मारहाण केल्याची माहिती समोर आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या मारहाणीत मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे पोलिस कागदपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी साहिल दशरथ कांबळे आणि पृथ्वीराज कोंडीराम कांबळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरुण दत्तू घोडके यांच्याकडे सोपविण्यात आला असून लवकरच अजून काही धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे.

Post a Comment
0 Comments