Type Here to Get Search Results !

चंदगडच्या सुपुत्राचा अमेरिकेत गौरव; सचिन बल्लाळ यांना डॉक्टरेट पदवी प्रदान


चंदगड प्रतिनिधी | रुपेश मऱ्यापगोळ : सामाजिक कार्य आणि समाजकल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे चंदगडचे सुपुत्र तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन सदानंद बल्लाळ यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.अमेरिकेतील विद्यापीठाच्या वतीने त्यांना ‘डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क अँड सोशल वेल्फेअर’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या सन्मानामुळे चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत राहिलेल्या सचिन बल्लाळ यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी जोडून घेत समाजातील विविध घटकांसाठी काम करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. सामाजिक कार्यातून निर्माण झालेली त्यांची वेगळी ओळख आणि समाजासाठी असलेली तळमळ यामुळे या सन्मानाकडे विशेष अभिमानाने पाहिले जात आहे.


जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी ग्रामीण भागातील विविध प्रश्न, नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच सामाजिक विकासाच्या विषयांवर सातत्याने आवाज उठविला. समाजातील गरजू व वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून काम करण्यावर त्यांनी भर दिला.‘डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क अँड सोशल वेल्फेअर’ ही पदवी मिळाल्याने त्यांच्या सामाजिक कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही गौरव प्राप्त झाल्याची भावना त्यांच्या समर्थक व हितचिंतकांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशामुळे चंदगडच्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे.


सामाजिक कार्याची धुरा अधिक व्यापक पद्धतीने पुढे नेत समाजातील गरजू घटकांसाठी भविष्यातही प्रभावीपणे कार्य करण्यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास सचिन बल्लाळ यांनी व्यक्त केला. या उल्लेखनीय यशाबद्दल चंदगड तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार, समर्थक आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




Post a Comment

0 Comments