Type Here to Get Search Results !

कळसगादेत रस्ता अडवून शासकीय वाहन रोखल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

 


चंदगड : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांच्या जिल्हा परिषद शाळांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कळसगादे येथे वाहनांचा मार्ग अडवून हुज्जत घातल्याप्रकरणी चौघांविरुद्ध चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दौलत मारूती दळवी, शिवाजी गोपाळ सुतार, गणपत गुंडू सुतार आणी मनोहर तुकाराम दळवी (सर्व रा.कळसगादे, ता. चंदगड) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.


गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कळसगादे गावातील रस्त्यावर जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट देण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन व आमदार शिवाजी पाटील यांचे वाहन पुढे गेल्यानंतर संबंधित आरोपींनी संगनमत करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे शासकीय वाहन, आमदारांच्या सुरक्षा रक्षकांची वाहने अडविल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. कळसगादे येथील शाळेला भेट देणे नियोजित असताना भेट न देता पुढे का जात आहात, असा सवाल करीत आरोपींनी वाहनचालक व संबंधितांशी हुज्जत घातली.त्यामुळे शासकीय दौऱ्यादरम्यान वाहतुकीचा मार्ग अडवून शासकीय वाहनांना रोखल्याचा आरोप चौघावर ठेवण्यात आला असून कॉन्स्टेबल सुनील सुतार यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments