Type Here to Get Search Results !

‘विकासाला विरोध नको; साथ द्या-उपसरपंच विशाल बल्लाळ

 


हेलिपॅडमुळे हेरेच्या विकासाला मिळणार ‘टेकऑफ’!


चंदगड | प्रतिनिधी : आज हेलिपॅड, उद्या पर्यटनाचे केंद्र आणि भविष्यात रोजगाराचे नवे हब, अशी विकासाची नवी संकल्पना हेरे गावासमोर उभी राहिली आहे. हेरे (ता. चंदगड) येथे प्रस्तावित हेलिपॅडमुळे गावाच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता असून, पर्यटन, दळणवळण, रोजगार आणि स्थानिक व्यवसायांच्या वाढीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरू शकतो, असा विश्वास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांच्या निधीतून हेरे येथे हेलिपॅड उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचना व मागणीनुसार गायरान जमिनीबाबत ग्रामपंचायतीने ठराव केला आहे. मात्र, या ठरावाचा आधार घेत ग्रामपंचायत जमीन विक्री करीत असल्याचे आरोप केले जात असून, हे आरोप तथ्यहीन व ग्रामपंचायत तसेच पदाधिकाऱ्यांची जाणीवपूर्वक बदनामी करणारे असल्याचा आरोप सरपंच जयश्री गावडे, उपसरपंच विशाल बल्लाळ व सदस्यांनी चंदगड येथे पत्रकार परिषदेत केला.हेरे आणि परिसराला नैसर्गिक, ऐतिहासिक व पर्यटनाच्या दृष्टीने मोठी क्षमता आहे. या परिसरात पर्यटकांची संख्या वाढली तर त्याचा थेट फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला होऊ शकतो. हेलिपॅडमुळे बाहेरील पर्यटक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांची ये-जा वाढण्याची शक्यता असून, त्यातून हॉटेल, रेस्टॉरंट, वाहन व्यवसाय, स्थानिक उत्पादने, सेवा क्षेत्र आणि विविध छोट्या-मोठ्या व्यवसायांना चालना मिळू शकते.



‘हेलिपॅड हे केवळ हेलिकॉप्टर उतरण्याचे ठिकाण नाही; ते विकासाचे प्रवेशद्वार ठरू शकते,’ अशी भूमिका उपसरपंच विशाल बल्लाळ यांनी मांडली.पर्यटनाचा विस्तार झाला तर त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे. परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण, वाहतूक सुविधा, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर नागरी सुविधांना गती मिळू शकते. पर्यटनवाढीमुळे स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती होऊन गावातील आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होईल.


शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणे, स्थानिक महिला बचतगटांना व्यवसायाच्या संधी मिळणे, युवकांना पर्यटन व सेवा क्षेत्रात रोजगार मिळणे आणि गावातील व्यावसायिकांना नवीन ग्राहकवर्ग मिळणे, असे अनेक सकारात्मक परिणाम भविष्यात दिसू शकतात, असा विश्वास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.हेलिपॅडसाठी केलेल्या ठरावाचा चुकीचा अर्थ काढून ग्रामपंचायत जमीन विक्री करीत असल्याचा आरोप करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे विशाल बल्लाळ यांनी सांगितले.


“गायरान जमिनीबाबत जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीने ठराव केला आहे. ग्रामपंचायतीच्या अधिकारातील विषयावर केलेल्या ठरावाला जमीन विक्रीचा रंग देणे चुकीचे आहे. विकासकामाला विरोध करायचा असेल तर तो कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने करावा. मात्र, जाणीवपूर्वक ग्रामपंचायत व पदाधिकाऱ्यांची बदनामी केल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल,” असा इशारा बल्लाळ यांनी दिला.


गावाच्या विकासासाठी येणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाचे राजकारण करण्यापेक्षा त्याचे भविष्यातील परिणाम तपासणे गरजेचे आहे. हेलिपॅडचा प्रकल्प हा एखाद्या व्यक्तीचा किंवा गटाचा नसून हेरे गावाच्या भविष्यातील विकासाशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांपेक्षा गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


“आज घेतलेला विकासाचा निर्णय उद्याच्या पिढीला रोजगार, व्यवसाय आणि पर्यटनाच्या संधी देऊ शकतो. त्यामुळे हेरेच्या विकासाच्या वाटेत अडथळे निर्माण करण्याऐवजी विकासाच्या या संधीचे स्वागत केले पाहिजे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.


पत्रकार परिषदेस ग्रामपंचायत सदस्य संतोष भिसे, मृणाल महेश सावंत, तौफिरा वाहीद आगा, प्रमिला पांडुरंग चंदगडकर, माजी सरपंच पंकज तेलंग, माजी उपसरपंच आप्पाजी गावडे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील, लालासो पीर खान, श्रीकांत सावंत, रियाज दड्डीकर, महेश सावंत, यासीन दड्डीकर, योगेश बल्लाळ, निसार आगा, निलेश गावडे, शैलेश पाटील, संजय जाधव, अंजुद्दीन दड्डीकर, विजय पाटणेकर, मयूर नाईक, अतिश नाईक, संभाजी नाईक, विक्रम नाईक, अशोक नाईक, धनाजी नाईक, महेश नाईक, अजय नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments