आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर उत्पादन वाढवा; माजी आमदार राजेश पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन
चंदगड, प्रतिनिधी : शेतजमीन ही शेतकऱ्याची खरी ताकद असून, ती विकून मिळणाऱ्या तात्पुरत्या पैशापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून याच जमिनीतून अधिक उत्पादन व उत्पन्न मिळविण्यावर भर द्यावा. वाढता उत्पादन खर्च, मजुरांची टंचाई आणि बदलती शेतीपद्धती लक्षात घेता कृषी यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी आमदार राजेश पाटील यांनी केले.
हलकर्णी येथे कृषितेज ऑटोमोबाईल्स यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘स्वराज 855 एफई प्रोटेक’ या आधुनिक ट्रॅक्टरचे अनावरण करण्यात आले. माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती भरमाना गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी व विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
‘शेती वाचवा, शेती समृद्ध करा’ असा संदेश देत राजेश पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा बदलत्या काळानुसार शेतीत नवे तंत्रज्ञान आणले पाहिजे. यंत्रांच्या वापरामुळे वेळ, श्रम आणि खर्चात बचत होऊन शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होते. त्यामुळे उपलब्ध जमिनीचा योग्य वापर करून शेती अधिक फायदेशीर करण्याची गरज आहे.
कृषितेज ऑटोमोबाईल्सचे संचालक प्रशांत गावडे व प्रदीप नाडगोंडा यांनी चंदगड-आजरा परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी ‘स्वराज 855 एफई प्रोटेक’ ट्रॅक्टरची कार्यक्षमता, तांत्रिक वैशिष्ट्ये आणि विविध शेतीकामांमधील उपयुक्तता याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. बदलत्या कृषी व्यवस्थेत यांत्रिकीकरण स्वीकारल्यास कमी मनुष्यबळात अधिक काम करणे शक्य होणार असून, शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावरही नियंत्रण ठेवता येईल, असा सूर कार्यक्रमात उमटला.
कार्यक्रमास पंचायत समिती सभापती विलास नाईक, जि. प. सदस्या मानसी भोगण, माजी जि. प. सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण, पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेनके, माजी सभापती जगन्नाथ हुलजी, सत्यम सावंत भोसले, स्वप्नील सावंत, तालुका संघाचे उपाध्यक्ष तानाजी गडकरी,सरपंच राहुल गावडे, विलास सुतार, बसवंत अडकूरकर, अंकुश गावडे, राहुल शिवणगेकर, प्रा. सुखदेव शहापूरकर, एकनाथ कांबळे यांच्यासह शेतकरी, विविध संस्थाचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments