पत्रकार महेश बसापुरे व राजेंद्र माळीही पोलिसांच्या ताब्यात; शासकीय यंत्रणेतील सहभागाच्या दिशेने तपासाची चक्रे
चंदगड : चंदगड येथील शासकीय जमिनीचे कथितरीत्या दस्तऐवज करून त्यांची विक्री केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी तातोबा गावडा याची पोलीस कोठडी पुन्हा दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे प्रकरणाचे धागेदोरे अधिकच गंभीर असल्याचे समोर येत असून तुर्केवाडी येथील ‘युवा संवाद’चे पत्रकार महेश बसापुरे आणि गडहिंग्लज येथील राजेंद्र माळी यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
राजेंद्र माळी हे महसूल विभागातील कर्मचारी असून त्यांनी यापूर्वी चंदगड तहसील कार्यालयात काम केले होते. सध्या त्यांची बदली कोल्हापूर येथील कार्यालयात झाल्याची माहिती आहे. या प्रकरणातील काही व्यवहारांना किंवा कागदपत्रांच्या प्रक्रियेला त्यांनी मदत केली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची चर्चा असून, याबाबत पोलिसांकडून अधिकृत तपशील समोर येणे बाकी आहे.
पत्रकारितेच्या ओळखीचा गैरवापर केल्याचा आरोप
दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब चर्चेत आली आहे. महेश बसापुरे आणि तातोबा गावडा यांनी पत्रकारितेच्या ओळखीचा कथित गैरवापर करून अनेक व्यक्तींना आर्थिक व्यवहारांमध्ये अडकविल्याचे किंवा त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे आरोप पुढे येत आहेत. हे आरोप नेमके कितपत खरे आहेत, त्यामध्ये कोणाचा प्रत्यक्ष सहभाग आहे आणि आर्थिक व्यवहार झाले असल्यास त्याचा तपशील काय आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
बसापुरे हे पाटणे फाटा येथून ‘युवा संवाद’ नावाचे साप्ताहिक चालवत असल्याचे सांगण्यात येते. या कार्यालयातून संबंधित व्यवहारांशी निगडित काही कामकाज होत होते का, याचीही चौकशी सुरू असल्याचे समजते. पोलिसांनी महेश बसापुरे यांचा लॅपटॉप जप्त केला असून, त्यातील माहिती तपासासाठी महत्त्वाची ठरू शकते.
महसूल यंत्रणेतील आणखी कोणाचे धागेदोरे?
या संपूर्ण प्रकरणात शासकीय जमिनीचे दस्तऐवज कसे तयार झाले, त्यासाठी कोणती कागदपत्रे वापरण्यात आली, संबंधित नोंदी कोणी हाताळल्या आणि या प्रक्रियेत महसूल विभागातील आणखी कोणाची भूमिका होती का, याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित असल्याचे बोलले जाणाऱ्या एका महिला कर्मचारी यांचीही चौकशी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संबंधित महिला शासकीय पदावर कार्यरत असून ‘युवा संवाद’ कार्यालयात सहाय्यक म्हणून काम करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, त्यांची नेमकी भूमिका काय आहे, हे पोलिसांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
‘मोठे मासे’ कोण? चर्चेला उधाण
तातोबा गावडा याच्यावर कारवाई झाल्यानंतर आता या प्रकरणात आणखी कोणकोणत्या व्यक्तींची नावे समोर येतात, याकडे चंदगडचे लक्ष लागले आहे. शासकीय जमीन व्यवहारात केवळ मध्यस्थ किंवा कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्यांपुरतीच कारवाई मर्यादित राहणार की या संपूर्ण व्यवहारामागील आर्थिक व प्रशासकीय साखळीही उघड होणार, हा खरा प्रश्न आहे.
शासकीय जमीन ही सार्वजनिक मालमत्ता असल्याने तिच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी केवळ वरवर न करता दस्तऐवजापासून पैशाच्या व्यवहारापर्यंत आणि मध्यस्थांपासून संबंधित शासकीय यंत्रणेपर्यंत प्रत्येक कडी तपासली जावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून शासकीय जमिनीच्या व्यवहारामागील संपूर्ण साखळी जनतेसमोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान, वरील आरोप व संबंधित व्यक्तींची भूमिका ही पोलिस तपासाच्या अधीन असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.


Post a Comment
0 Comments