Type Here to Get Search Results !

शिवाजी विद्यापीठाच्या नियतकालिक स्पर्धेत माडखोलकर महाविद्यालयाच्या अक्षय कांबळेचा प्रथम क्रमाक


चंदगड : चंदगड येथील र.भा.माडखोलकर महाविद्यालयाच्या मराठी विभागातील कुमार अक्षय संजय कांबळे याने शिवाजी विद्यापीठाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील नियतकालिक स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या ‘खेडूत’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या ‘चंदगडचा शिमगोत्सव - एक अनोखी परंपरा’ या माहितीपर लेखास स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ५ हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले.


शिवाजी विद्यापीठाच्या वतीने विविध महाविद्यालयांमधून प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या सर्जनशील लेखनाला प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील लोकपरंपरा, संस्कृती, सामाजिक जीवन आणि विविध विषयांचा अभ्यास करून लेखन करावे, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.


माडखोलकर महाविद्यालयाचे ‘खेडूत’ हे नियतकालिक विशेष दर्जाचे मानले जाते. या नियतकालिकातून विद्यार्थ्यांच्या साहित्यिक आणि सर्जनशील प्रतिभेला सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. अक्षय कांबळे याने चंदगडच्या वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सव  परंपरेचा माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वेध घेत लेखाच्या माध्यमातून या स्थानिक सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी दर्शन घडविले. त्याच्या या लेखनाची शिवाजी विद्यापीठाच्या नियतकालिक स्पर्धेत दखल घेण्यात आली.


या उल्लेखनीय यशाबद्दल अक्षय कांबळे यांचा महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एम.एम.माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. माने यांनी अक्षयचे अभिनंदन करून त्याला पुढील शैक्षणिक व साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी सह संपादक डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. एस. एन. पाटील, डॉ. राजकुमार तेलगोटे, डॉ. एन. के. पाटील, डॉ. रंजना कमलाकर, यांच्यासह  प्रा. ए . डी. कांबळे, प्रा. एस. एम. पाटील.डॉ. एन एस मासाळ  डॉ. एस. एस. सावंत, डॉ.ए वाय जाधव, डॉ. एस डी गावडे, डॉ. पी. एल. भादवणकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.


अक्षय कांबळे याच्या या यशामुळे र.भा माडखोलकर महाविद्यालयाच्या शैक्षणिक व साहित्यिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यार्थ्यांच्या सर्जनशील लेखनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘खेडूत’ नियतकालिकाचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे.

Post a Comment

0 Comments