चंदगड : चंदगड तालुक्यातील मळवीवाडी येथील १२ एकर सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी ठोस कारवाई पोलीस प्रशासनाकडून न झाल्याने सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.अद्याप कित्येक दिवस उलटूनही संशयित आरोपी पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.बनावट कागदपत्रांच रचलेलं प्रकरण संपूर्ण कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला हादरवून सोडणार ठरलं आहे.
मळवीवाडी येथील गट क्रमांक २३० मधील सुमारे १२ एकर (४.७९ हेक्टर) वर्ग-२ ची शासकीय जमीन खाजगी व्यक्तींच्या नावे (वर्ग-१) करण्यात आली. व त्यानंतर सर्व प्रकरणाचा भांडाफोड झाला.अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा हुबेहूब बनावट आदेश, त्यावर बोगस डिजिटल सही आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा खोटा शिक्का वापरून हा कागदी खेळ रचण्यात आला. हा आदेश थेट तहसील आणि ग्राममहसूल कार्यालयात सादर करून ७/१२ पत्रकावर जमिनीचा फेरफारही मंजूर करून घेतला गेला.कागदोपत्री सर्वकाही सुरळीत पार पडले आणि अवघ्या दोन महिन्यांत जमीन तब्बल २९ लाखांना विकली गेल्याची चर्चा रंगली.
सगळं काही सुरळीत सुरू असताना स्थानिक नागरिक बसवंत बडस्कर यांनी माहिती अधिकारात (RTI) या आदेशाची प्रत मागितली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून "असा कोणताही आदेश पारितच झालेला नाही" असा लेखी खुलासा आला अन् दलालांचा हा संपूर्ण बनाव उघड्यावर आला.एका साध्या खाजगी व्यक्तीला शासकीय सही-शिक्क्यांचा वापर करून एवढा मोठा फेरफार करणे एकट्याला शक्य आहे का? की महसूल यंत्रणेतील काही 'अदृश्य हात' त्याच्या पाठीशी होते? मध्यस्थी,दलाल,सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई होणार की नाही? जमिनीचा प्रत्यक्ष लाभ घेणाऱ्या सूत्रधारांचे चेहरे समोर येणार का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणं गरजेचं असून जिल्हा प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन कसून चौकशी करावी अशी मागणी होतं आहे.

Post a Comment
0 Comments