Type Here to Get Search Results !

मराठीला बोली भाषांचा समृद्ध वारसा : डॉ.तारा भवाळकर

'मायबोली, रंग कथांचे...' पुस्तकात संजय साबळे यांच्या चंदगडी कथेचा समावेश...

चंदगड प्रतिनिधी : 'सर्वसामान्यांच्या जीवनातील बोली भाषा जी वर्षांनुवर्षे बोलली जाते.त्यातून विचारांची,भावनांची,संवेदनांची देवाण-घेवाण होत असते. या बोली भाषांमुळेच आज मराठी समृद्ध आहे. तो वारसा आपण जपला पाहिजे.' असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा .डॉ. तारा भवाळकर यांनी सचिन वसंत पाटील यांनी संपादीत केलेल्या 'मायबोली, रंग कथांचे...' या कथासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी केले.पुस्तकात २२ बोली भाषांतील कथांचा समावेश असून, त्यात चंदगडी बोलीतील कथेलाही सन्मान मिळाला आहे.  चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलचे उपक्रमशिल शिक्षक संजय साबळे यांची कथा समाविष्ट आहे.

मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोली भाषा बोलल्या जातात. त्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने साहित्यिक सचिन पाटील यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे.या पुस्तकात चंदगडी कथा लिहिणारे लेखक संजय साबळे यांचे दोन काव्यसंग्रह व मुलांसाठी चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहे. आपल्याला या पुस्तकात लिहिण्याची संधी मिळाली आणि चंदगडी बोली राज्याच्या पटलावर नेता आली याबद्दल समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.शब्दसाहित्य विचारमंच या साहित्य संस्थेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

डॉ तारा भवाळकर पुढे म्हणाल्या, 'प्रत्येक भाषेला अनेक उपभाषा, बोली भाषा असतात. तशाच मायमराठीलाही आहेत. मराठी अभ्यासकांना, साहित्यिकांना त्यांची नेहमीच अपूर्वाई वाटत आली आहे.  एकाच अर्थाचे निरनिराळे शब्द आपल्याला बोलींमध्ये ऐकायला मिळतात. दुर्दैवाने बोलीतील असे अनेक शब्द आहेत जे लुप्त होत आहेत. त्यांची जपणूक करण्याची आज गरज आहे. मराठीतील अनेक बोली भाषांपैकी तावडी, दख्खनी, पोवारी, माणदेशी, मराठवाडी, झाडी बोली, चंदगडी, लेवा गणबोली, मालवणी, जालनी, गोंडी, बंजारा, पावरा, वऱ्हाडी, नगरी, अहिराणी, कोल्हापुरी, आगरी, भिलाऊ इत्यादी निवडक बावीस मराठी बोलीतील कथा घेऊन त्यांचे संपादन सचिन पाटील यांनी केले आहे. हे खूप वेगळ्या प्रकारचे आणि महत्वाचे पुस्तक आहे. शब्दान्वय प्रकाशन, मुंबई यांनी हे पुस्तक आकर्षक स्वरुपात सिद्ध केले आहे. त्या त्या भागातील बोलींचा अभ्यास करून तिची गुणवैशिष्ट्ये, शैली आणि गाभा शोधायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अभ्यासपूर्ण अशी दीर्घ प्रस्तावनाही लिहिली आहे. बोली लुप्त होण्याच्या या काळात याची खरोखरच गरज आहे. म्हणूनच 'मायबोली, रंग कथांचे...' या संपादनाचे काम कौतुकास्पद आहे. मराठी भाषा समृद्ध करणारे आहे.'




Post a Comment

0 Comments