Type Here to Get Search Results !

कालकुंद्री येथे घराला लागलेल्या आगीत ३ लाख रोख रकमेसह ८ लाख नुकसानीचा अंदाज

 

चंदगड प्रतिनिधी : कालकुंद्री,ता. चंदगड येथे काल रात्री नऊच्या सुमारास लागलेल्या आगीत तुकाराम सुबराव पाटील यांचे राहते घर व घरातील प्रापंचिक साहित्य पूर्णपणे भस्मसात झाले. या दुर्दैवी घटनेत त्यांचे ३ लाख रोख रकमेसह सुमारे ८ लाख रुपये पेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून याबाबतचा पंचनामा तलाठी कार्यालय मार्फत करण्यात आला आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


कालकुंद्री येथील तानाजी गल्लीत तुकाराम पाटील यांचे जुने राहते कौलारू घर आहे. काल दि. ५ रोजी रात्री पाउणे नऊच्या सुमारास घरावरील कौलांतून आगीचे लोळ बाहेर पडताना नागरिकांनी पाहिले. गावात भर वस्तीत असलेल्या या आगीमुळे एकच हाहाःकार उडाला. सर्व गावकरी मिळेल त्या साहित्यातून पाणी घेऊन आज विझवण्यासाठी धावले. तरुणांनी जीवावर उदार होत आग आटोक्यात आणल्याने नजीकची घरे आगेच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचली. आग आटोक्यात आल्यानंतर काही वेळाने गडहिंग्लज येथून आलेल्या अग्निशामक बंबाने आग पूर्णपणे विझवली.

आग लागण्याच्या काही वेळ आधी तुकाराम पाटील यांचे कुटुंबीय गावातील पाहुण्यांच्या घरी लग्नकार्य असल्यामुळे तिकडे गेले होते. घरातील सर्व सदस्य लग्न घरात जेवण्यासाठी गेले असल्याने चूल किंवा गॅस पेटवण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे ही आग विजेच्या शॉर्टसर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज सकाळी वीज वितरण कंपनी कोवाड कार्यालयाचे सहा. अभियंता संजय मगदूम यांनी घटनास्थळी पाहणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे.


तुकाराम पाटील यांनी नवीन घर बांधकाम सुरू केले असल्यामुळे त्यासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी ऊस बिल व अन्यत्र जमवाजमव करून २ लाख रुपये घरी ठेवले होते. तर त्यांचा मुंबई येथे पायन्यासोनिक कंपनीत इंजिनिअर असलेला मुलगा विनायक हा लग्नकार्यासाठी कालच दुपारी गावी आला होता. त्याने वर्क फ्रॉम होम साठी कंपनीचे लॅपटॉप तसेच लग्नकार्य व घरी  देण्यासाठी आणलेले १ लाख रुपये असे ३ लाख रोख रुपये आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. लॅपटॉप सोबत त्यातील कंपनीचा डाटाही जळून नष्ट झाला. एवढेच काय कुटुंबातील सदस्यांचे अंगावरील कपडे वगळता घरातील सर्व कपडेलत्ते, अंथरूण पांघरूण, दागदागिने व धान्य अक्षरशः जळून खाक झाले. बांधकाम सुरू असलेले घर अद्याप अपूर्ण असल्याने हे कुटुंब सध्या उघड्यावर पडले आहे. दरम्यान रात्री आग लागल्याचे समजताच चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशाने कोवाड दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. 

सदर घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी शरद मगदूम, तलाठी शुभम मुंडे, पोलीस पाटील संगीता कोळी, उपसरपंच संभाजी पाटील, ग्रामपं. सदस्य प्रशांत मुतकेकर, कोतवाल शशिकांत सुतार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.



Post a Comment

0 Comments