Type Here to Get Search Results !

आता चार लाख लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार, कारण काय?

मुंबई प्रतिनिधी : लाडक्या बहिणीबाबत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला महाराष्ट्रात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालाय. या योजनेमुळे महायुतीचे सरकार सत्तेत पुन्हा आल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण ही ऐतिहासिक योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरल्याचे बोलले जातेय. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात देण्यात आलेत. तर निवडणुकीपूर्वी आमचे जर पुन्हा सरकार आले तर आम्ही 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, अशी महायुतीने घोषणा केली होती. सुरुवातीला ज्या महिलांनी अर्ज दाखल केले होते. त्या सर्व महिलांच्या खात्यात 1500 रुपये टाकण्यात आले. मात्र आता निवडणुकीनंतर मागील एक दोन महिन्यांपासून या लाडक्या बहीण योजनेत कटाक्षाने आणि बारकाईने निकष पाहिले जात आहेत. काही दिवसांपूर्वी लाडक्या बहिणीत पाच लाख महिलांना विविध निकषामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. तर आता आणखी चार लाख महिलांना विविध निकषात बसत नसल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे. यामुळे आता या योजनेतून अपात्र महिलांची संख्या नऊ लाखापर्यंत पोहोचली आहे. परिणामी सरकारचे या एका योजनेतून 945 कोटी रुपये वाचणार आहेत.

नेमके निकष कोणते? : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून काही दिवसांपूर्वी पाच लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवल्यानंतर आता या योजनेत सरकारकडून नवे निकष लागू केले जाणार आहेत. विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणीने या योजनेत अर्ज दाखल केल्यामुळे अशा लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आलंय. तसेच नमो शेतकरी योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांची पाच लाख संख्या आहे. अशा महिलांना आता लाडक्या बहिणी योजनेतील केवळ 500 रुपये मिळणार आहेत. तर नमो शेतकरी योजनेतून एक हजार रुपये मिळणार आहेत. अशा पाच लाख बहिणी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरल्यात. दुसरीकडे दिव्यांग विभागातून लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींनाही या योजनेतून वगळले जाणार आहे. तसेच ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे आणि ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत कामाला आहे, अशा महिलांनाही वगळले जाणार आहे. याव्यतिरिक्त ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे, अशा लाडक्या बहिणींनाही या योजनेतून वगळले जाणार आहे. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यात बँकेत ई- केवायसी करणे आणि सोबत हयातीचा दाखला जोडणे अनिवार्य करण्यात आलेत.

प्राप्तिकर विभागाची मदत घेणार : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेत चुकीच्या पद्धतीने अर्ज करून लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्यानंतर सरकारने आता कठोर पाऊल उचललंय. वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांहून कमी दाखवून काही महिलांनी लाभ घेतलाय. यामुळे आता याबाबत सरकार अधिक आक्रमक झाले असून, लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे की नाही? हे तपासण्यासाठी राज्य सरकार प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे. विशेष म्हणजे नव्याने केवायसी केलेल्या किंवा आधार जोडणी केलेल्या महिलांना जून-जुलै महिन्यांपासून लाभ न देता अर्ज मंजूर झालेल्या पुढील महिन्यापासून या योजनेचा लाभ राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार असून, सरकारचे 945 कोटी रुपये बचत होणार आहे. परंतु सरकारचे किचकट नियम आणि निकषामुळे लाडक्या बहिणीमधून नाराजी व्यक्त करण्यात येतेय.

फेब्रुवारीच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत लाडक्या बहिणी : महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे दोन हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे 2100 रुपये लाडक्या बहिणींना कधीपासून मिळणार? असा सवाल लाडक्या बहिणीतून उपस्थित केला जातोय. दुसरीकडे मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात 2100 रुपये द्यायचे की नाही? यावर निर्णय होण्याची शक्यता असताना आता फेब्रुवारी महिना संपत आला तरी अजूनही या महिन्यातील हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार? या प्रतीक्षेत लाडक्या बहिणी आहेत.

लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही : जे सरकारने सुरुवातीला निकष ठेवले होते तेच निकष आहेत. परंतु जर अर्जदार महिला या दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असतील किंवा त्यांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार असेल किंवा त्यांचे अडीच लाखांपेक्षा उत्पन्न अधिक असेल तर हे निकष सुरुवातीलाच होते. परंतु जर आता नवीन काही निकष आले असतील तर ते बघावे लागतील, त्याची माहिती घ्यावी लागेल. परंतु सरकारने लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिलंय. त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणीची फसवणूक करणार नाही, लाडक्या बहिणीवर अन्याय होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.





Post a Comment

0 Comments