(कोवाड-माणगाव रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी)
चंदगड प्रतिनिधी : कोवाड ते माणगाव रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ पूर्ण करावे, या मागणीसाठी निट्टर (ता. चंदगड) येथे आज निट्टर ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. दुपारी १२ वाजता विद्यार्थी, ग्रामस्थ व प्रवाशांनी रस्त्यावर ठिय्या दिला. अधिकारी व ठेकेदाराला आंदोलकांनी धारेवर धरले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता डी. वाय. यड्रावी यांनी २१ मार्चपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. कोवाड ते माणगाव रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. उखडलेली खडी व धुळीने माखलेल्या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी वैतागले आहेत. वारंवार सूचना देऊनही शासकीय अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या निट्टर ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी सरपंच गुलाब पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. दुपारी बारा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. कडाक्याच्या उन्हात विद्यार्थी, ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या मारला. रास्ता रोकोला पोलिसांनी विरोध केला; पण आक्रमक झालेल्या आंदोलकांनी माघार घेतली नाही.
रखडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सतत अपघात होत होते. अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या दुरवस्थेकडे शासकीय अधिकारी लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी ठेकेदाराला व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. घोषणाबाजी केली. रास्ता रोकोमुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सुरू झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलक व अधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणली. शाखा अभियंता यड्रावी यांनी आंदोलकांच्या भावना समजून घेऊन २१ मार्चपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले; पण दिलेल्या वेळेत रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर २१ मार्चनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.यावेळी उपसरपंच भरत पाटील, गोविंद पाटील, नरसिंह पाटील, सचिन पाटील, आप्पा वांद्रे, जोतिबा सांबरेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments