Type Here to Get Search Results !

संतोष मळविकर यांना जामीन मंजूर तर विश्वास पाटील यांची पोलीस खात्यांतर्गत चौकशी.

चंदगड/प्रतिनिधी : जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला असा आरोप ठेवून अटक  करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्ते, एडवोकेट संतोष मळविकर यांना चंदगड येथील दिवाणी व फौजदारी  न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली. त्याचबरोबर चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची जिल्हा पोलीस प्रशासनाकडून चौकशी करण्याचे आदेश दिले असून एडवोकेट मळवीकर यांना कोणताही त्रास न देण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

गेल्या काही महिन्यापासून चंदगड तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीवर, मटका,गुटखा, जुगार हे पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे सुरू असल्याबद्दल चंदगड बारचे अध्यक्ष, व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते एड. संतोष मळवीकर यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात जनजागृती करून रान उठवले होते, तरीही वरिष्ठांच्या कडून त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दिल्याने चार दिवसापूर्वीच त्यांनी गडहिंग्लज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांना शिष्टमंडळाद्वारे तालुक्यातील अवैध धंद्याबाबत पुरावे देऊन पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यामुळे पोलीस प्रशासन त्यांच्यावर चिडून असल्याचे बोलले जात होते. सोमवारी नांदवडे येथील कुंदेकर या कार्यकर्त्याच्या कामासाठी मळवीकर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व एड. मळवीकर  यांच्यात बाचा-बाची झाली त्या अनुषंगाने सोमवारी दिवसभर मळवीकर यांना पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवण्यात आले होते व उशिरा त्यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिली व शासकीय कामात अडथळा आणला असा ठपका  ठेवून त्यांना अटक केले होते. त्यामुळे चंदगड तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली होती, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या  मळवीकर यांना पोलिसांनी अटक केल्याने चंदगड तालुक्यातील जनमानसात उलट सुलट चर्चा व संताप प्रतिक्रिया होती. आज त्यांना न्यायालयासमोर  हजर केले असता एड. मळवीकर यांना जामीन दिला, तर पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना पोलीस खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले असून मळवीकर यांना इथून पुढे कोणताही त्रास पोलिसांच्याकडून होता कामा नये असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

चंदगड पोलिसांनी मळवीकर यांना अटक करण्याची तत्परता दाखवण्या अगोदरच तालुक्यातील अवैधंद्यावर  जुगार हॉटेल चालवणाऱ्या काळे धंद्यांच्या मालकांच्यावर वचक ठेवला असता तर बरे झाले असते. अशी चर्चा सुरू झाली आहे. आता एडवोकेट संतोष मळवीकर कोणती भूमिका घेतात याकडे चंदगडसह गडहिंग्लज  विभागाचे लक्ष लागून राहिले  आहे.





Post a Comment

0 Comments