चंदगड/प्रतिनिधी : भारतात अद्यापही आयुर्विमा विषयी लोकांच्या मध्ये म्हणावे तशी जनजागृती झालेली नाही, परिणामी 70% हून अधिक लोक आयुर्विमाच्या,सुविधेपासून वंचित आहेत, आयुर्विमा व्यवसायात करू पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी ही फार मोठी संधी असून हे क्षेत्र रोजगार निर्मितीसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन सनंदन गायकवाड यांनी व्यक्त केले.ते येथील र.भा माडखोलकर महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभाग व करिअर मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आयुर्विमा आणि करिअरच्या संधी या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस डी गोरल होते.
मार्गदर्शन करताना गायकवाड पुढे म्हणाले की, एलआयसी ही भारतातील आयुर्विम्याचा व्यवसाय करणारी सर्वात मोठी सरकारी कंपनी असून या कंपनीने अधिकार पदावर काम करण्यासाठी विमा प्रतिनिधी म्हणून व्यवसाय करण्यासाठी लाखो लोकांना संधी दिली आहे.आज सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने महिलांना सुद्धा या क्षेत्रात आपले आयुष्य घडवण्याची संधी एलआयसीने उपलब्ध करून दिली असून महिला समृद्धी,सखी योजना हा त्याचाच एक भाग आहे.यामध्ये महिलांना दरमहा सात हजार विद्या वेतनाबरोबरच विकलेल्या विमा योजना वर प्रचलित दराने भरघोस कमिशन दिले जाते.अमर्याद उत्पन्नाचे सन्मान जनक करिअर म्हणून विद्यार्थ्यांनी याकडे बघावे असे त्यांनी प्रतिपादन केले.
भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे विकास अधिकारी तथा मुख्य विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करणारे रमेश.डी.पाटील यांनी एलआयसीच्या माध्यमातून कशाप्रकारे चांगले करिअर घडवता येते.यावर प्रकाश टाकताना स्वतःच्या आयुष्याचा पट विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविताना सातत्यपूर्ण परिश्रम व जिद्दीच्या जोरावर तुम्हाला हवे तितके उत्पन्न मिळवता येते, तुमच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होऊन तुम्ही अनुभव संपन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी होऊ शकता असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य गोरल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,विमा हे करिअर व उत्पन्न मिळवण्यासाठी अत्यंत चांगले क्षेत्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता आयुर्विमा क्षेत्रात कोणतीही आर्थिक गुंतवणुकी शिवाय स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असे आवाहन केले.
प्रास्ताविक समन्वयक डॉ. टी. ए कांबळे यांनी केले.डॉ. आर. एन साळुंखे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला डॉ.एस एन पाटील, डॉ.के एन निकम,डॉ. पांडुरंग भागवणकर, डॉ.जी वाय कांबळे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.





Post a Comment
0 Comments