Type Here to Get Search Results !

साहित्यच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम-डॉ. चंद्रकांत पोतदार

चंदगड/प्रतिनिधी : समाजातल्या संवेदनशील मनातून साहित्याची निर्मिती होते.नोकरी व्यवसाय करता करता छंद जोपासले की जगणं सुखकर होत आणि आपल्या हाती असलेले काम सुद्धा प्रभावी होते.शिक्षक कविता करत असतील तर ते कविता विद्यार्थ्यांना चांगली समजून सांगू शकतात आणि उत्तम संस्कारी नागरिक निर्माण होवू शकतात, त्यामुळे वाचन व लेखनाची अवड सर्वांनी जोपासावी असे कोवाड येथे पार पडलेल्या "मोगरा"या काव्यसंग्रह  प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील बोलत होते.

वाचन वेडा समाज तयार होण्यासाठी लेखनवेडी माणसे साहित्य निर्मितीत उतरली पाहिजे..आणि वाचनालये गजबजली पाहिजेत असे साहित्यिक के जे पाटील म्हणाले.कवयित्री सविता कुंभार यांनी 'माझा कवितेचा प्रवास' यावर अतिशय सुंदर विवेचन केलं.लेक घडवायला बाप किती प्रगल्भ असावा लागतो,याचे त्यांनी दाखले दिले.वाचनातून लेखनाकडे सुरू झालेला प्रवास ऐकताना खचाखच भरलेल्या सभागृहात निरव शांतता होती.एखाद्या तत्ववेत्याने बोलावं इतकं प्रभावी त्या बोलत होत्या.घर-संसार,कुटुंब समाज आणि मित्रपरिवार यांनी मी कशी घडले हे विषद करताना आपल्याच काही कवितांचे त्यांनी दाखले दिले आणि रसिकांची मने जिंकली.देहभान विसरून जाणे म्हणजे काय हे त्या तासभरात रसिकांना अनुभवता आले.आईवडीलांकडून वाचनाचे मिळालेले बाळकडू, पती श्रीधर कुंभार आणि सासू सासरे यांच्या साथीने आज काव्य संग्रह प्रकाशनापर्यंत आले या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचे  प्रास्ताविक प्रा.संजय साबळे यांनी करताना सविताताई यांच्या कवितांचा दर्जेदारपणा अधोरेखित केला.

जेष्ठ कवी प्रा. डॉ . चंद्रकांत पोतदार  यांच्याहस्ते  `मोगरा ` या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला.तालुक्याला पु.ल. देशपांडे ,रणजित देसाई यांच्या सारख्या विख्यात साहित्यिकांचा वारसा लाभला असून त्यात सविता कुंभार यांनी भर घातली असे ते म्हणाले.साहित्य क्षेत्रात पदार्पण करू पाहणाऱ्या नवोदित कवींना मोलाचे व  विस्तृत मार्गदर्शन त्यांनी केले व मोगरा अखंड वाचकांना सुगंधित करेल असे मतही व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात सविता कुंभार यांचं कौतुक करत स्वामीकार रणजित देसाईंच्या जन्मभूमीत असे  साहित्य सोहळे भविष्यात कायम संपन्न व्हावेत , अशी मनोकामना व्यक्त केली . 


 
प्राथमिक शिक्षिका प्रमिला कुंभारताई यांनी महिला भगिनींनीसह मुख्यप्रवेशद्वाराजवळ रेखाटलेली रांगोळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती.यावेळी पंचक्रोशीतील रसिकांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती. सर्व शिक्षक व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी , किणी , कालकुंद्री व कडलगे ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी , शिक्षक व कुंभार कुटुंबीय कार्यक्रमाला उपस्थित होते.काव्यमय आणि ओघवत्या सुंत्रसंचालनाने अध्यापक विनायक गावडा यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. तर आभार आनंद कांबळे यांनी मानले.कार्यक्रमाचे नियोजन आप्पाजी रेडेकर ,विनायक गिरी ,विनायक गावडा, आनंद कांबळे,बाळकृष्ण मुतकेकर , संभाजी पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व रसिक परिवाराचे योगदान लाभले,असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत अशी प्रेक्षकांची अपेक्षा पाहून कार्यक्रमाची यशस्वीता दिसून आली.

Post a Comment

0 Comments