चंदगड प्रतिनिधी : "ज्ञानाची भूक भागवतात ती माणसं भाग्यवान असतात. जगण्याचा मनमुराद आनंद लुटता आला पाहिजे. संकटावर मात करून जगता आले पाहिजे. सौंदर्य आपल्या दृष्टीत असते. जगण्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. छोट्या छोट्या गोष्टीत जगण्याचा आनंद घेता येणे म्हणजे सुंदर जगणं होय." असे प्रतिपादन संजय साबळे यांनी केले. ते मौजे कारवे (ता. चंदगड) येथील सरस्वती वाचनालयाच्यावतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ' जगणे सुंदर आहे." या विषयावर दुसरे पुष्प गुंफत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपव्यवस्थापक प्रकाश दुकळे हे होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रो. (डॉ.) प्रकाश दुकळे यांनी करून दिला.श्री. साबळे पुढे म्हणाले की, "छोट्या दुःखांना कवटाळून बसण्यापेक्षा अति दुःखात असणाऱ्या व्यक्तीकडे पाहून स्वतःची दुः खं विसरली पाहिजे. त्रस्त, ग्रस्त, व्यस्त, स्वस्त अशी माणसं असतात; पण मस्तपणे जगता आले पाहिजे. प्रत्येकाच्या दिवाणखान्यात दूरसंच आल्यापासून आणि अति सुखसुविधामुळे माणूस सुंदर जगणं विसरून गेला आहे."
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर कांबळे आणि आभार ॲड. कार्तिक पाटील यांनी मानले. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष द.य. कांबळे, विष्णू कार्वेकर, नारायण ओऊळकर,जोतिबा आपके, नारायण पाटील, काजमिल फर्नांडिस, महादेव दुकळे, राजू चिंचणगी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन प्रकाश कांबळे, जॉनी फर्नांडिस, सौ. हेमिल फर्नांडिस आणि सौ. चंदा कांबळे यांनी केले. या प्रसंगी बहुसंख्य वाचक आणि श्रोते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments