Type Here to Get Search Results !

मोबाईलवरचे हात पुस्तकावर हवेत-राजेंद्र शिवणगेकर

चंदगड/प्रतिनिधी : "वाचनाचे महत्त्व हे व्यक्तीच्या जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वाचनामुळे ज्ञान वाढते,विचार प्रगती करतात. वाचनामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. कौटुंबिक व्यवस्था विस्कळीत करून भावनिक नाते संपवणाऱ्या मोबाईलच्या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढले पाहिजे. मोबाईलवरचे हात पुस्तकावर यायला हवेत. तरच समाज वैचारिक दृष्ट्या सक्षम होईल." असे प्रतिपादन राजेंद्र शिवणगेकर यांनी केले. ते मौजे कारवे (ता. चंदगड) येथील सरस्वती वाचनालयाच्यावतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफत होते.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतान लोबो हे होते.

        

प्रारंभी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सूर्याजी ओऊळकर यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रकाश दुकळे यांनी करून दिला.राजेंद्र शिवणगेकर पुढे म्हणाले की, " वाचनाने व्यक्तिमत्त्व विकासाला मदत होते. वाचन केल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो. वाचनामुळे कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढते. साहित्य वाचून आपण सामाजिक दृष्टीकोन विकसित करू शकतो. सुसंस्कारित व विचारपूर्वक पावले उचलणारे भावी पिढी निर्माण होण्यासाठी  पुस्तक वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे." असे मत व्यक्त केले.त्यानंतर त्यांनी द.मा. मिरासदार यांच्या 'भानाचे भूत' या कथेचे विनोदी शैलीत तसेच भावनिक कथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. 

      

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार पुंडलिक सुतार यांनी मानले. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष द.य. कांबळे, विष्णू कार्वेकर, नारायण ओऊळकर,जोतिबा आपके, नारायण पाटील, काजमिल फर्नांडिस, महादेव दुकळे, राजू चिंचणगी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संयोजन प्रकाश कांबळे, जॉनी फर्नांडिस,हेमिल फर्नांडिस आणि चंदा कांबळे यांनी केले. तसेच बहुसंख्य वाचक आणि श्रोते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments