Type Here to Get Search Results !

कामचुकार अधिकारी,कर्मचाऱ्यांना इशारा,निदर्शनास आल्यास कारवाई करणार-गटविकास अधिकारी

 

(गटविकास अधिकारी यांचे अधिकारी-कर्मचारी यांना नियमांचे उल्लंघन न करण्याचे पत्र)


चंदगड/प्रतिनिधी : शासनाने जनतेच्या सोयीसाठी व हितासाठी विविध प्रशासकीय पदे निर्माण करून या पदांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शासनाकडून दिले जाणारे गलेलठ्ठ वेतन आणि विविध सोयी-सवलतींचा पुरेपूर लाभ कर्मचारी घेताहेत. मात्र शासकीय कामकाजा दिवशी सकाळी ०९.४५ ते सायंकाळी ०६.१५ या कामकाजाच्या वेळेत अनेक कर्मचारी कर्तव्यात कसूर करत कार्यालयीन ठिकाणी हजर राहत नसल्याचे सातत्याने दिसून येते. कर्मचाऱ्यांसाठी दुपारी ०१.०० ते २.०० या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भुत असताना भोजनासाठीची 'अर्ध्या तासाची वेळ' देखील धाब्यावर बसवली जात आहे. अधिकारी कर्मचारी सोयीनुसार कार्यालयाला येतात व कार्यालयातून निघून जात असल्याने कर्मचाऱ्यांसाठी शासनाने ठरवलेली सकाळी पावणेदहा ते सव्वा सहा ही कामकाजाची वेळ केवळ कागदावरच राहिली आहे. कार्यालयीन ठिकाणी कामकाजाचा दिवस व कामकाजाची वेळ लिहिलेला फलक, तक्रार,नोंद वही, दैनंदिन अहवाल नोंदवही (हालचाल रजिस्टर) ठेवली नसल्याचे किंवा नागरिकांना ती उपलब्ध करून दिली जात नसल्याचे दिसून येते. 


थोडक्यात शासनाने जनतेच्या हिताच्या दृष्टिने सूचविलेल्या विविध बाबींची कार्यालयीन ठिकाणी अंमलबजावणी होत नाही. तसेच कामकाजादिवशी आणि कामकाजाच्या वेळेत आपल्या नियोजित कामकाजाच्या ठिकाणी अनधिकृतपणे गैरहजर राहून नियमांचे उल्लंघन तथा कर्तव्यात कसूर करत रीतसर रजा न टाकता अधिकारी-कर्मचारी विविध खाजगी कार्यक्रमांना उपस्थित राहात असल्याचे वेळोवेळी दिसून येते.ही शासनाची आणि जनतेची मोठी फसवणूक आहे. तरी कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी 'सत्य घटना'चे संपादक राहुल पाटील यांनी दि. १७ एप्रिल २५ रोजी निवेदनातून गटविकास अधिकारी पंचायत समिती चंदगड यांचेकडे केली होती.या निवेदनाच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी दि. ०२मे२५ रोजीच्या पत्राने पंचायत समिती अधिनस्त विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांना नियमांचे उल्लंघन न करण्याचे तथा तसे आढळून आल्यास कारवाई केली जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे पत्र काढले आहे.


गटविकास अधिकारी यांनी पंचायत समिती अधिनस्त विभागांना काढलेल्या पत्रात म्हटले आहे, की सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी शासकीय वेळेत (सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत) कार्यालयामध्ये हजर राहावे. दुपारी भोजनाच्या वेळेमध्ये दुपारी १.०० ते २.०० मध्ये जास्तीत जास्त अर्धा तास भोजनासाठी द्यावा. तसेच अधिकारी/कर्मचारी हे फिरतीसाठी जात असतील तर हालचाल नोंदवहीमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांनी नोंद करावी. कार्यालयीन ठिकाणी कामकाजाचा दिवस व कामकाजाची वेळ लिहिलेला फलक लावावा, हालचाल नोंदवही अद्यावत करून कार्यालयात ठेवावी. तक्रार वही देखील दर्शनी भागात ठेवावी. यात कोणत्याही प्रकारची हयगय होता कामा नये याची दक्षता घ्यावी. तसेच वर नमूद शासकीय नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा गटविकास अधिकारी यांनी पत्रातून दिला आहे.

या विभागांना काढले पत्र

१) उप अभियंता (बांधकाम/ग्रामीण पाणीपुरवठा)

२) तालुका आरोग्य अधिकारी

३) पशुधन विकास अधिकारी (विस्तार)

४) गट शिक्षणाधिकारी

५) बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग

६) वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र (सर्व)

७) विस्तार अधिकारी (सर्व)

८) सर्व अधिकारी/कर्मचारी.

प्रत्यक्ष कारवाईची गरज:-


गटविकास अधिकारी यांनी कारवाईचे पत्र काढले असले तरी अनेक अधिकारी/कर्मचारी आजही नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. त्यामुळे केवळ पत्र काढण्याचा सोपस्कार न करता कार्यालयांना अचानकपणे प्रत्यक्ष भेटी देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच जनतेनेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी तक्रार नोंद वहीत तारीख व वेळेसह आपला अभिप्राय लिहायला हवा.कारवाईसाठी आवाज उठवायला हवा.

Post a Comment

0 Comments