Type Here to Get Search Results !

चाळोबा गणेश' हत्ती आक्रमक,कारचा चुराडा!


(चंदगड बेळगाव सीमेवरील बेकिनकेरे परिसरात दहशत कायम,वनखात्याने बंदोबस्त करण्याची मागणी)


चंदगड/प्रतिनिधी : कोल्हापूर वनक्षेत्रातील आजरा येथील चाळोबा जंगलातून बेळगाव तालुक्याच्या सीमेवर महिनाभरापूर्वी आलेला चाळोबा गणेश हत्ती दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहे. शुक्रवारी (दि. १६) मध्यरात्री सदर हत्तीने एका घराशेजारी पार्क केलेल्या कारचा पायाने तुडवून तसेच सुळे मारून अक्षरशः चुराडा केला. या घटनेमध्ये सचिन पाटील (रा. गुगल सर्कल, मडगाव, गोवा) यांचे सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले.


महिनाभरापासून चाळोबा गणेश हत्तीचा बेकिनकेरे या गावामध्ये धुमाकूळ सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी याच गावाशेजारील हॉटेलच्या मागील बाजूने जाऊन सोंडीने डी फ्रीज बाहेर काढून फोडून टाकले.अलीकडील काही दिवसांत काही दुचाकींचे व कारचा चुराडा केल्याने मोठं नुकसान झालं आहे. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. बेकिनकेरे -उचगाव मार्गावर गावाशेजारी डॉ. निरंजन कदम यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या घरी गोवा मडगाव येथून सचिन पाटील (मूळगाव निट्टर, ता. चंदगड) हे आपल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी आले होते. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता त्यांनी घरासमोर कार पार्क केली होती. मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास चाळोबा गणेश हत्तीने या कारचा चेंदामेंदा केला. कार पूर्णपणे स्क्रॅप झाली आहे. हत्तीने पायाने दाबून कार चेपवली आहे. तसेच सुळे मारूनही नुकसान केले आहे. तसेच जवळ असलेल्या संभाजी कदम यांच्यासह किरण कदम यांच्या दोन पाण्याच्या प्लास्टिक टाक्या फोडून टाकल्या. 

या हत्तीने जवळचे असलेल्या उसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सदर हत्ती आता अधिक आक्रमक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. नागरी वस्तीमध्ये येऊन हल्ला करत आहे. चाळोबा गणेशचे आगमन होण्यापूर्वी ओमकार नावाच्या हत्तीनेही बेळगाव तालुक्याच्या धामणे परिसरात धुमाकूळ घातला होता. तो सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे गेला आहे. ओमकार हत्तीच्या हल्ल्यात काजू वेचणाऱ्या शेतकऱ्याचा महिनाभरापूर्वी बळी गेला आहे. हत्तीची दहशत वाढल्याने वनखात्याने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments