Type Here to Get Search Results !

पाण्याच्या बहाण्याने घरात घुसून चोरट्याची निट्टरमध्ये दहशत.

 


(वृद्धावर कोयत्याने हल्ला,मंगळसूत्र पळवले)


चंदगड/प्रतिनिधी : निट्टर (ता.चंदगड) येथे रात्रीच्यावेळी पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून चोरट्याने हातातील कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. घरातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून घेतले. पळून जाताना प्रतिकार केलेल्या पतीच्या हातावर कोयत्याचा वार करून जखमी केले.अंधाराचा फायदा उठवत घराबाहेर थांबलेल्या साथीदाराच्या मदतीने चोरट्याने पलायन केल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी पुंडलिक परसू पाटील (वय ७०) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोवाड पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.


कोवाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंडलिक पाटील यांचे निदूर येथील 'गवळाकडे' नावाच्या वस्तीत जक्कनहट्टी ते कोवाड रस्त्यालगत घर आहे. घरी पुंडलिक पाटील, त्यांची पत्नी यल्लू व नातू ओंकार राहतात. गुरुवारी रात्री सर्वजण जेवण करून झोपले होते. रात्री ११.४५ वाजता पाण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने हाक मारून दरवाजावर थाप मारली. वीज पुरवठा खंडित झाल्याने ओंकारने मोबाईलची बॅटरी लावून दरवाजा उघडला व बाटलीतून त्यांना पाणी दिले. पाणी पिऊन झाल्यानंतर त्याने मिठाची मागणी केली. त्यामुळे ओंकार मीठ आणण्यासाठी घरात गेला असता, संबंधित व्यक्तीने तोंडाला मास्क बांधून त्याच्या मागून घरात प्रवेश केला. पाठीमागून आलेल्या व्यक्तीचा ओंकारला सुगावाही लागला नाही. बरणीतील मीठ हातात घेऊन होते.


मागे फिरणाऱ्या ओंकारवर चोरट्याने हातातील कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अंधारात दोघांच्यात झटापट सुरू झाली. भीतीने ओंकार मोठ्याने ओरडला. त्यावेळी त्याचे आजोबा पुंडलिक व आजी यल्लू धावत आले. चोरट्याने आजीच्या गळ्यातील बेंटेक्स मंगळसूत्र हिसडा मारून तोडले. पुंडलिक यांनी प्रतिकार केला. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या उजव्या हाताच्या बोटांवर व डाव्या हाताच्या कोपरावर कोयत्याचा घाव घालून घरातून पळ काढला. रस्त्यावर थांबलेल्या आपल्या साथीदाराच्या मदतीने त्याने गाडीवरून पलायन केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आजोबांना पाहून ओंकारने आरडाओरड करून शेजारच्या लोकांना बोलावून आणले. जखमी पुंडलिक यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले. शुक्रवारी सकाळी ठसे तज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले

Post a Comment

0 Comments