Type Here to Get Search Results !

कोवाड प्राथमिक शाळेतील भोजन कक्ष मोडकळीस –विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका.


(तहसीलदारांनी दिल्या तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना)


चंदगड/प्रतिनिधी : कोवाड (ता. चंदगड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील भोजन कक्षाची अवस्था अत्यंत दयनीय आणि धोकादायक झाली आहे. या कक्षाची खोली पूर्णतः मोडकळीस आलेली असून, परिसरात प्रचंड अस्वच्छता, गवताची वाढ, किडे-किटकांचा वावर, आणि सर्वात चिंताजनक म्हणजे छताला भगदाड पडून पावसाचे पाणी गळत आहे, अशा अवस्थेत चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार तयार केला जात आहे.या पार्श्वभूमीवर "या अन्नाला खऱ्या अर्थाने पोषण आहार म्हणता येईल का?" असा गंभीर प्रश्न पालक व ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तयार होणाऱ्या आहाराची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत मोठ्या प्रमाणावर शंका व्यक्त करण्यात येत आहेत.


या गंभीर बाबीची आमदार शिवाजीराव पाटील व तहसीलदार राजेश चव्हाण यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान भोजन कक्षाची अत्यंत वाईट परिस्थिती पाहून त्यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच, विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर कोणताही विपरित परिणाम होऊ नये, यासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची शिफारस केली.या पाहणीवेळी कोवाड विभागातील प्रमुख पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ उपाययोजना राबवण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले.शाळा व्यवस्थापन, ग्रामस्थ व पालकांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की, लवकरात लवकर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात आहार मिळावा.

Post a Comment

0 Comments