(चंदगड ते जांबरे मुख्य मार्गावरील रस्त्यातील खड्डे मुजविणे,दुतर्फा झाडांच्या फांदया तोडण्याची ग्रामस्थाची मागणी)
चंदगड/प्रतिनिधी : चंदगड ते जांबरे मार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून या खड्ड्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे मुजवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे ग्रुप ग्रामपंचायत कोकरे आडूरे व जांबरे, उमगाव भागातील नागरिकांकडून बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. तसेच या मार्गावरील असलेल्या दुतर्फा झाडांच्या फांद्या वाढल्या असून वाहनधारकांना समोरील वाहन येत असताना दिसत नाही व रस्त्यावरच काही लोकांनी गायरा तयार केल्या असून रस्ता अरुंद झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने या मार्गावरील खड्डे व फांद्या तोडण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून येत आहे.
याआधीही या रस्त्यावर अनेक दुचाकी,चार चाकी अपघात झाले असून येथील लोकांना नाहक त्रास होत आहे.या भागामध्ये तीन ग्रामपंचायत व काही छोटी -मोठी गावे,जांबरे धरण प्रकल्प येत असून या भागात पर्यटकांची संख्याही वाढली आहे.एकीकडे जंगली भाग असल्याने रानटी प्राण्यांपासून मुख्य मार्गांवरून जाताना प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दुतर्फा झाडांच्या फांद्या तोडणे हेही तितकेच गरजेचे बनले आहे.तसेच कित्येक वर्ष या भागातील काही ठिकाणी रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही.प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अजून किती बळी जाणार? असा प्रश्न येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.त्यामुळे बांधकाम विभागाने यावर तात्काळ लक्ष घालण्याची गरज आहे.
'जांबरे ते आडूरे घडामोडी' या नावाचा व्हाट्सअँप ग्रुप मधून या भागातील लोकांनी या समस्यांवर आवाज उठवत प्रशासनाचा निषेध केला. व भागातील सर्वजण एकत्र चंदगड प्रशासनाला निवेदन दिले.एकंदरीत,येणाऱ्या काळात प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा आम्ही जनआंदोलन उभारू असा ईशाराही देण्यात आला आहे.यावेळी जांबरे गावचे सरपंच विष्णू गावडे,कोकरे-आडुरे गावचे सरपंच जोतिबा किरमटे,कृष्णा सावंत,कांता गावडे,ज्ञानेश्वर धुरी,सुरेश दळवी,लखन गावडे यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments