Type Here to Get Search Results !

मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्तीगृहाच्या जागेचा प्रश्न मार्गी.

 


चंदगड/प्रतिनिधी : गेल्या पंचवीस वर्षापासून हक्काच्या जागेच्या प्रतीक्षेत असलेल्या चंदगड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृहाला ब्लॅक पॅंथर पक्षाच्या प्रयत्नामुळे हक्काची जागा मिळाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे.

                          

संपूर्ण महाराष्ट्रभर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीग्रहे आपल्या हक्काच्या जागेत प्रशस्त इमारती बांधून कार्यरत आहेत.चंदगड तालुक्यातही 25 वर्षांपूर्वी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले होते. परंतु सदरचे वसतीगृह आजतागायत भाड्याच्या इमारतीत सुरू आहे.चंदगड तालुका हा दुर्गम व मागास असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे.केवळ चंदगडला शिक्षणाची सोय असल्याने तालुक्याच्या सर्व खेड्यापाड्यातून मागासवर्गीय विद्यार्थी मोठ्या संख्येने वसतीगृहात प्रवेश घेऊन उच्च शिक्षण घेत आहेत. मात्र,या वसतीगृहाला हक्काची जागा व प्रशस्त इमारत नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.याचा विचार करून ब्लॅक पॅंथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई व चंदगड तालुका अध्यक्ष प्रा.दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय चंदगड व जिल्हाधिकार्यालय कोल्हापूर येथे वसतीगृहाला हक्काची जागा मिळावी म्हणून आंदोलन करून पाठपुरावा सुरू ठेवला होता.अखेर या प्रयत्नांना यश मिळाले व शासकीय पातळीवर मंजुरी मिळून गट नंबर 863 मधील बारा गुंठे जमीन अधीक्षक डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतीगृह चंदगड असे नाव सातबारा पत्रकी नोंद करण्यात आले. 


एकंदरीत वसतीगृहाची प्रशस्त इमारत बांधली जाणार असून विद्यार्थ्यांची कायमची गैरसोयी दूर होणार आहे.याकामी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली,तत्कालीन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे,नुतन प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तत्कालीन तहसीलदार विनोद रनावरे,सध्याचे तहसीलदार राजेश चव्हाण,वसतीगृहाचे तत्कालीन अधीक्षक प्रकाश नाईक यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळे पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई व तालुकाध्यक्ष प्रा.दीपक कांबळे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. तसेच वस्तीगृहाचे नाव नोंद असलेला सातबारा उतारा वस्तीगृहाचे नुतन अधिक्षक सदानंद बगाडे व लिपिक सुरेश बुवा यांना सुभाष देसाई,खेडूत शिक्षण मंडळाचे संचालक प्रा.आर.पी.पाटील तसेच दौलत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर गावडे यांच्याहस्ते देण्यात आला.यासाठी केलेल्या आंदोलनात पक्षाचे निरीक्षक विष्णू कांबळे, उपाध्यक्ष पंडित कांबळे,सचिव सुधाकर कांबळे,वैजनाथ कांबळे,प्रकाश कांबळे,माजी प्राचार्य गुंडू कांबळे, युवराज कांबळ यांच्यासह रामपूर, कोकरे तसेच तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments