(विद्यार्थ्यांनी सादर केली पारंपरिक वनभाज्यांची माहिती)
चंदगड/प्रतिनिधी : श्री.हनुमान विद्यालय करंजगाव तालुका चंदगड येथे ‘आनंदी शनिवार’ निमित्त एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला.पावसाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी "औषधी भाजी माहिती व रानभाजी प्रदर्शन" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांनी घरून विविध प्रकारच्या पारंपरिक रानभाज्या आणून त्यांची माहिती सादर केली. या भाज्यांचे औषधी गुणधर्म, पारंपरिक उपयोग, पोषणमूल्ये यावर आधारित माहिती विद्यार्थ्यांनी कलात्मक पद्धतीने मांडली. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांना स्थानिक वनसंपत्तीचे महत्त्व नव्याने उमगले.या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जे. सुतार, तसेच सामाजिक कार्यकर्ते रुकमाना गोरल आणि मारुती गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक आर.आर. कांबळे यांनी केले. त्यांनी रानभाज्यांचे शालेय जीवनातील शैक्षणिक व आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित केले.सदर कार्यक्रमाला मेटकर एम. एल, जी. आर. बामणे,अंकुश गावडे इतर शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी सजवलेल्या रानभाज्यांच्या रंगीत स्टॉल्स, माहिती फलक, मौखिक सादरीकरण यामुळे संपूर्ण परिसरात शैक्षणिक व पर्यावरणपूरक वातावरणाची अनुभूती निर्माण झाली.श्री हनुमान विद्यालयाने राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक अन्नसंपत्तीबद्दल जागरूकता निर्माण करणारा आणि ग्रामीण संस्कृतीशी नाते घट्ट करणारा ठरला.



Post a Comment
0 Comments