Type Here to Get Search Results !

डेंगू प्रतिबंध महिना अंतर्गत बागिलगे डुक्करवाडी विद्यालयात जनजागृती मोहीम उत्साहात संपन्न.

 



चंदगड/प्रतिनिधी : डेंगू या गंभीर आजाराचा मुकाबला करण्यासाठी स्वच्छता राखणे, साठवलेल्या पाण्याचे व्यवस्थापन करणे आणि डास निर्मूलन करणे अत्यंत गरजेचे आहे. या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्यास डेंगूचा प्रसार रोखता येतो, असे प्रतिपादन कीटकशास्त्रज्ञ सुभाष कांबळे यांनी केले.डुक्करवाडी विद्यालय, बागिलगे येथे डेंगू प्रतिबंध महिना (जुलै) निमित्त आरोग्य जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक टी. व्ही. पाटील होते. प्रारंभी ए. बी. नाईकवाडे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.प्रमुख मार्गदर्शक  सुभाष कांबळे यांनी विद्यार्थ्यांना डेंगूची लक्षणे, कारणे व प्रतिबंधक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.विशेष म्हणजे, त्यांनी गप्पी मासे प्रत्यक्ष दाखवून त्यांचा डासाच्या अळ्यांवर होणारा परिणाम स्पष्ट केला.


“गप्पी मासे डासाच्या अळ्यांना खाऊन त्यांची संख्या कमी करतात. पाण्याच्या टाक्यांमध्ये हे मासे सोडल्यास डेंगूचा फैलाव रोखता येतो,” असे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांना शास्त्रीय दृष्टिकोनातून समज प्राप्त झाली. तर अध्यक्ष मुख्याध्यापक टी व्ही पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्य बाबत जागरूक असले पाहिजेत तरच आपण सुदृढ आणि निरोगी जीवन जगू शकतो असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमात आरोग्य सेवक पुंडलिक पाटील, आरोग्य सेविका सरिता नाईक,  आशा सेविका रेणुका कांबळे व अंजना कांबळे यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि अनेकांनी आरोग्याशी संबंधित प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले.


सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र शिवणगेकर यांनी केले. त्यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून डेंगू प्रतिबंधासाठी स्वयंप्रेरणेने पावले उचलण्याचे आवाहन केले.या उपक्रमाला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ विनोद मोरे,प्रा आ केंद्र माणगाव तालुका चंदगड कडील वैधकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका व बीडी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या शेवटी ‘स्वच्छता राखा – डेंगू टाळा’ या घोषवाक्याने विद्यार्थ्यांनी परिसर जागवला.




Post a Comment

0 Comments