जनसुरक्षा कायदा म्हणजे अघोषित आणीबाणी-ब्लॅक पँथर
प्रविणदादा गायकवाड यांना संरक्षण द्या-ब्लॅक पँथर पक्षाचा निवेदनाद्वारे इशारा
कोल्हापूर /प्रतिनिधी : अलीकडे सादर करण्यात आलेला जनसुरक्षा कायदा हा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांना बाधा आणणारा असून, तो अघोषित आणीबाणीसारखाच असल्याचा आरोप ब्लॅक पँथर पक्षाने केला आहे.पुरोगामी विचारसरणीला दडपण्यासाठी 'अर्बन नक्षलवाद' या संकल्पनेचा गैरवापर होत असून, वैचारिक मतभेद करणाऱ्यांवर हा कायदा लादण्याचा प्रकार हुकूमशाहीकडे नेणारा आहे, असे मत पक्षाने एका पत्रकात व्यक्त केले.
संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रविणदादा गायकवाड यांच्यावर अलीकडे अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत, या हल्लेखोरांवर जनसुरक्षा कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा हा हल्ला सरकारच्या मौन पाठिंब्याने झाल्याचा जनतेत समज होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.गायकवाड यांना अद्याप पोलीस संरक्षण न दिल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासह राज्यातील सर्व पुरोगामी पक्ष व विचारधारेच्या नेत्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
ब्लॅक पँथर पक्षाने जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करत, तो अन्यथा लोकशाहीचा गळा घोटणारा आणि नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारा ठरेल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात ब्लॅक पॅंथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, तानाजी गोंधळी ,संतोष धवन, शारदा गायकवाड, पूजा सुतार ,विद्या शिंदे, दिनकर कांबळे ,पांडुरंग चौगुले आदींच्या सह्या आहेत.
Post a Comment
0 Comments