चंदगड/प्रतिनिधी : बेळगाव-वेंगुर्ला मुख्य रस्त्यावरील सततच्या अपघातांना आणि रस्त्याच्या दुरवस्थेला कंटाळून आज सकाळी १० वाजता तुर्केवाडी फाटा येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रताप उर्फ पिनू पाटील युवा फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागाने हे आंदोलन पार पडले.
गेल्या काही वर्षांत या रस्त्याने ५०० हून अधिक निरपराध नागरिकांचा बळी घेतला असून, दररोज प्रवास करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मद्यधुंद अवस्थेतील बेफाम वाहनचालक, जीर्ण एसटी बसेस, अपूर्ण दुरुस्ती, दिशादर्शक फलकांचा अभाव, वाळलेली झाडे ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे आंदोलकांनी सांगितले.प्रशासनाकडून केवळ खड्डे बुजवण्याचे काम करून वेळ मारून नेली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. रस्त्याच्या शाश्वत डांबरीकरणासाठी व रुंदीकरणासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलनात जोरकसपणे करण्यात आली.
यावेळी प्रताप पाटील (प्रताप उर्फ पिनू पाटील युवा फाउंडेशन), सरपंच संजीवनी आऊलकर, विलास पाटील, शंकर आऊलकर, बसवंत अडकुरकर, महादेव वांद्रे, नितीन फाटक, हरिभाऊ गावडे (संघर्ष प्रतिष्ठान), बाळू बोकडे, नारायण दळवी, प्रकाश पवार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.तहसीलदारांना आणि बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन देण्यात आले असून, तातडीने कार्यवाही न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
Post a Comment
0 Comments