ध्येय निश्चित करत विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतल्यास यश मिळते-प्रा. जॉर्ज क्रूज
चंदगड/प्रतिनिधी : ध्येय निश्चिती करून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतल्यास यश हमखास मिळते.त्यासाठी आळस झटकून विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन कोल्हापूर येथील विजयश्री अकॅडमी चे प्रमुख संचालक प्रा. जॉर्ज क्रूज यांनी केले.ते चंदगड येथील र.भा माडखोलकर महाविद्यालयाच्या 28 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जी. एस. पाटील होते.
प्रा.जॉर्ज आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, केवळ परीक्षेत मार्क मिळवणे म्हणजे यशस्वी होणे नव्हे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण वाचन करायला हवे, ग्रंथालयातील पुस्तके सतत हाताळायला हवीत, ध्येयपूर्तीसाठी सातत्यपूर्ण सराव, निश्चित मार्ग, प्रचंड महत्वकांक्षा असेल तर जगात आपल्याला कोणीच हरवू शकत नाही त्यासाठी वेळ न दवडता प्रत्येक क्षणाचा उपयोग करायला हवा. चांगल्या पुस्तकांची व चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहायला हवे तरच जीवनाला आकार मिळतो. थोरामोठ्यांची चरित्र वाचायला हवी, प्रवासवर्णने, आत्मचरित्र, वेगवेगळ्या लेखकांच्या जीवनातील घडामोडी, यशस्वी व अपयश लोकांच्या जीवनकथा नीट समजून घेऊन आचरण केल्यास आपण निश्चितपणे यशस्वी होतो असे सांगून खेडूत शिक्षण संस्थेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून आत्मचिंतन करायला भाग पाडले.
यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील म्हणाले की, आपण काढलेल्या महाविद्यालयाची प्रगती पाहून आत्यंतिक समाधान वाटते, ज्याप्रमाणे बाळाला जन्म दिल्यानंतर आईला आनंद मिळतो तसा आनंद कोवाड,चंदगड व नेसरी भागात काढलेल्या महाविद्यालया बाबत वाटतो असे सांगून त्यांनी मार्गदर्शन केले.बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. मनीषा नेसकर म्हणाल्या की, विद्यार्थी दशेतच चांगल्या संस्कारासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहायला हवे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करायला हवा असे सांगून त्यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. प्रारंभी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ एस.डी गोरल यांनी करून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी पीएचडी प्राप्त डॉ. राजकुमार तेलगोटे व डॉ. बी. एम पाटील यांचा सत्कार माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या खेडूत या नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सूत्रसंचालन डॉ. नंदकुमार मासाळ यांनी तर आभार प्रा. व्ही. के गावडे यांनी मांनले.यावेळी व्यासपीठावर संचालक सर्वश्री, प्रा. आर पी पाटील, प्रा. डॉ. एन एस पाटील, एल डी कांबळे, डॉ. पी आर पाटील, एम एन तुपारे, एन के पाटील, डॉ. एस पी बांदिवडेकर, शामराव मुरकुटे, शाहू फर्नांडिस यांच्यासह ॲड. संतोष मळवीकर, बाबुराव हळदणकर, अनिल कुराडे, सतीश सबनीस, उमर पाटील, यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments