चंदगड/प्रतिनिधी : महाविद्यालयीन जीवनामध्येच जिज्ञासूवृत्तीने चौफेर वाचन करून आचरण करणे गरजेचे असून स्वावलंबी होण्याबरोबरच निर्भयपणे अन्यायाविरुद्ध पेटून उठले पाहिजेत असे मत सामाजिक कार्यकर्ते व संत्याकुली या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक ॲड. संतोष मळवीकर यांनी केले.ते चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयात ग्रंथालय आणि वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'उद्योजक व लेखकाची यशोगाथा' या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक प्रा. आर पी पाटील होते.
ॲड. मळवीकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी झपाटून आपले कर्तव्य बजावले पाहिजेत,कोणतेही मिळेल ते काम करून स्वावलंबी बनले पाहिजेत, यासाठी कामाची लाज न बाळगता कष्ट करायला हवेत तरच आपले स्वप्न पूर्ण होते, विद्यार्थ्यांनी स्वप्न जरूर पाहावीत पण ती पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी असे सांगून ते पुढे म्हणाले की, केवळ पुस्तकी शिक्षण न घेता विद्यार्थ्यांनी समाजातील वेगवेगळ्या चुकीच्या घडलेल्या घटनेवर व्यक्त व्हायला हवे.कॉलेजचे जीवन प्रेमात वाया घालवण्यापेक्षा कष्टाने आपले ध्येय गाठून अशी भरारी घ्यावी की अनेकांना आश्चर्य वाटेल, आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव विद्यार्थ्यांनी सतत ठेवून कसे तरी कॉलेज करण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन उंच शिखरावर पोहोचले पाहिजेत असे सांगून त्यांनी आपण लिहिलेल्या संत्या कुली या पुस्तकाची जन्मकथा व आपल्या जीवनातील विविध प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध व प्रोत्साहित केले.
प्रारंभी प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. एस.डी. गोरल यांनी करून वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी बोध घेण्याचे आवाहन केले.यावेळी बोलताना खेडूतचे संचालक माजी प्राचार्य डॉ. पी.आर. पाटील म्हणाले की,ॲडव्होकेट संतोष मळवीकर हा आपल्या कॉलेजचा प्रामाणिक व धडाडीचा विद्यार्थी आहे. त्यांनी आपल्या अथक परिश्रमातून व कष्टातून आपले जीवन परिपूर्ण बनवले आहेत याचा सर्वांनी आदर्श घेणे गरजेचे असून अन्यायाविरुद्ध बंड करण्याची धमक त्यांच्यात असल्याने त्यांच्यातील नेतृत्व गुण सिद्ध झाले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रा. आर.पी पाटील म्हणाले की, खेडूत शिक्षण संस्थेतून अनेक गुणी व कर्तबगार विद्यार्थी निर्माण झाले, गोरगरीब वंचित व बहुजन समाजातील मुले मुली शिकावीत अशा उदात्तेतूने या कॉलेजची निर्मिती झाली आहे. संस्कार व विनयशीलता या गुणामुळे ॲडव्होकेट मळवीकर सारखी उत्तुंग व्यक्तिमत्व निर्माण झाल्याचे सार्थ समाधान वाटल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावेळी विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणा-या *इव्हेंट मॅनेजमेंट* या तीन महिन्यांच्या कोर्सेची प्रमाणपत्रे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.ॲड. संतोष मळवीकर यांचा संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ एस आर रंगनाथन याच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली.सूत्रसंचालन प्रा. आप्पासाहेब कांबळे यांनी केले. तर आभार श्रीनिवास पाटील यांनी मानले.या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष एल डी कांबळे, संचालक ॲड. एन एस. पाटील, इंजिनीयर एम. एन तुपारे, शामराव मुरकुटे, ॲड. अनिल तळगुळकर, विश्वनाथ ओऊळकर, यांच्यासह बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments