Type Here to Get Search Results !

महाविद्यालयीन जीवनात व्यसनापासून दूर रहा-आकाश भिंगारदिवे


चंदगड/प्रतिनिधी : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाडच्या एन. एस. एस विभाग आणि कोवाड पोलीस स्टेशनच्या वतीने अमली पदार्थ जनजागृती अभियान  महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे म्हणाले, तरुणांनी कॉलेज जीवनामध्ये व्यसनापासून दूर राहावे. पोलिसांच्या गुन्हेगारी रेकॉर्डमध्ये आज तरुणांचा भरणा होत आहे. सिगरेट, मावा, गांजा, कोकेन एम डी ड्रग यासारख्या व्यसनाच्या आहारी तरुण  जात आहे. सहज म्हणून,मज्जा म्हणून,मित्राच्या संगतीने आपण एकदा आमली पदार्थाचे सेवन करतो आणि मग कधी त्याच्या आहारी जातो हेच समजत नाही. अमली पदार्थांचे सेवन करणे आणि अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्याना साथ देणे कायद्याने गुन्हा आहे .त्यासाठी दहा वर्षाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे आता सावध व्हा. तसेच सोशल मीडियावर पोलिसांची नजर असून विधायक कामासाठी त्याचा वापर करा अन्यथा सायबर गुन्हा होऊ शकतो आणि आपले करिअर वाया जाऊ शकते. गुरुजन आई-वडील यांचा आदर्श ठेवा आणि पुस्तकांचे वाचन करा असे आवाहन त्यांनी केले. 


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एन.एस.एस विभाग प्रमुख प्रा.दीपक पाटील यांनी परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा आढावा घेऊन यामध्ये युवकांचा सहभाग वाढल्याबाबत चिंता व्यक्त केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.व्ही. आर.पाटील म्हणाले, महाविद्यालयीन तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घ्यावा समाजसेवा, देशसेवा करण्याची खूप मोठी संधी विद्यार्थ्यांकडे आहे त्यासाठी सकारात्मक विचार करावेत. सर्वोदय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चांगला नागरिक आणि माणूस घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामद्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होवे.प्रा.बी एस पाटील प्रा.आर टी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमासाठी हेड कॉन्स्टेबल अनंतराव देसाई,प्रा. के.पी वाघमारे, प्रा. ए.के कांबळे, प्रा. आप्पाजी ससेमारी, शंकर पुजारी,तुकाराम सुतार, रोहन सुतारसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रा.सी.ए.कणसे यांनी मानले.तर सूत्रसंचालन प्रा. संदीप पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments