Type Here to Get Search Results !

समाज प्रबोधन करत अंधश्रद्धेच्या कचाट्यातून जनाबाईची सुटका



(अंधश्रद्धेमुळे देवीचा कोप होईल या भीतीने जट न काढता सहन करत होत्या,प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. सुभाष कोरे व अशोक मोहिते यांच्या प्रयत्नांतून क्रांतिदिनानिमित्त जटमुक्ती)


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील बांद्रा वाडा येथील श्रीमती जनाबाई जानू लांबोरे (वय ३७) या गेली सहा-सात वर्षे डोक्यावर जटेचे ओझे वाहत होत्या. अपघातानंतर डोक्यावरील गंभीर जखम, केसांची निगा न राखता येणे, आणि त्यातून निर्माण झालेला गुंता यामुळे जटा तयार झाली होती. मात्र परिसरातील अंधश्रद्धाग्रस्त महिलांनी ती जट देवीची आहे, ती काढल्यास देवीचा कोप होईल, घराला अपाय होईल अशी भीती घालून जटा काढण्यापासून रोखले. परिणामी, इच्छा असूनही श्रीमती लांबोरे जट कायम ठेवण्यास बाध्य झाल्या.


या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर समाज प्रबोधनासाठी कार्यरत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अनिंस) कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.विलास पाटील व चंद्रकांत पाटील कालकुंद्रीकर यांच्या माध्यमातून अनिंसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, गडहिंग्लज अनिंसचे माजी कार्याध्यक्ष प्रा. सुभाष कोरे आणि सचिव अशोक मोहिते यांनी जनाबाई यांचे प्रबोधन केले. देवीच्या कोपाची भीती ही केवळ अंधश्रद्धा असून तिचा वास्तवाशी संबंध नाही, हे समजावून सांगत क्रांतिदिनानिमित्त त्यांच्या डोक्यावरील जट सुरक्षितरीत्या काढून टाकण्यात आली.


या प्रसंगी कुमारी भारती लांबोरे व पाटील परिवार उपस्थित होता. जनाबाई यांच्या जटमुक्तीच्या या कृतीने गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धेविरुद्ध जागरूकता निर्माण झाली असून समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन बळकट करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.

Post a Comment

0 Comments