Type Here to Get Search Results !

तिलारी, जंगमट्टी, आंबेवाडी परिसरात पर्यटकांची वाढती गर्दी, मात्र सुरक्षारक्षकांचा अभाव

 


(धरण परिसरात पोहणे, मासेमारी, हुल्लडबाजी यामुळे अपघाताचा धोका वाढतोय,स्थानीय नागरिकांकडून धरण परिसरात सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी तीव्र)


कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तिलारी, जंगमट्टी, आंबेवाडी, हेरे आणि पाटणे हे परिसर निसर्गसंपन्न असून, वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. धरण, धबधबे, घाट परिसर, हिरवळ आणि थंड हवामानामुळे येथे दर वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. मात्र, या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा पूर्ण अभाव असल्यामुळे पर्यटक बेधडक वर्तन करतात, आणि त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे.


तिलारी डॅम व जंगमट्टी डांबर रस्त्यावर पर्यटकांची विशेष गर्दी पाहायला मिळते. अनेकदा येथे ‘ओल्या पार्ट्या’, मोठ्या आवाजात संगीत, पाण्यात उड्या मारणे, पोहणे आणि मासेमारीसारख्या गोष्टी सर्रासपणे केल्या जातात. धरण परिसर जलसाठ्याने भरलेला असतो, प्रवाहही अज्ञात असतो. अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक नसेल तर अपघात होण्याची शक्यता अधिकच वाढते.सुरक्षारक्षक नसल्याचा गैरफायदा पर्यटक घेत आहेत. काही वेळा एखादा सुरक्षा रक्षक असतो, पण तो केवळ प्रतीकात्मकपणे फिरून निघून जातो. अनेकदा सुरक्षेच्या चौक्या उभ्या केल्या जातात, मात्र त्या रिकाम्याच असतात. यामुळे परिसरातील सुरक्षा 'रामभरोसे' असल्याचे चित्र आहे.


कोकण, गोवा, बेळगाव, कर्नाटकातून तसेच चंदगड तालुक्याच्या सीमाभागातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. त्यांना कुठलाही अडथळा नसल्यामुळे धरणाच्या सांडव्याजवळ किंवा खोल पाण्याच्या भागातही प्रवेश करतात, आणि कधी कधी त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. काही घटनांमध्ये पर्यटक पाण्यात बुडाल्याचे प्रसंगही याआधी घडले आहेत.


स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली जात आहे की,“धरण क्षेत्रात कायमस्वरूपी प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात करावेत, आणि आवश्यक त्या ठिकाणी चेतावणी फलक, प्रवेशबंदी बोर्ड व सायरन व्यवस्था करावी.”


तिलारी आणि आजूबाजूच्या भागात निसर्ग पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, या ठिकाणच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.पर्यटकांचे प्राण धोक्यात न पडता त्यांनी निसर्गाचा आनंद घेणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी योग्य ती सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे.

Post a Comment

0 Comments