Type Here to Get Search Results !

महसूल सप्ताहानिमित्त रामपूर येथे शतकोटी वृक्षलागवड उपक्रम


(मंडल अधिकारी देवीदास तारडे व तलाठी प्रथमेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती, 'वृक्षमित्र' पुरस्कार विजेते शिक्षक बाबुराव वरपे यांचे उपक्रमाला योगदान)


चंदगड/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या 'महसूल सप्ताहा'निमित्त शतकोटी वृक्षलागवड उपक्रमाच्या अंतर्गत रामपूर (ता. चंदगड) येथे पाणंद रस्त्याच्या दुतर्फा जंगली रोपांची वृक्षलागवड करण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन नागनवाडीचे मंडल अधिकारी देवीदास तारडे व तांबुळवाडी सजाचे तलाठी प्रथमेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.


कार्यक्रमाचे स्वागत शिक्षक बाबुराव वरपे यांनी केले. यावेळी बोलताना मंडल अधिकारी तारडे यांनी सांगितले की, महसूल विभागाच्या वतीने 'महसूल सप्ताहा'दरम्यान विविध उपक्रम राबवले जात असून, वृक्षलागवड व संवर्धन हा पर्यावरण समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. या मोहिमेत शाळा, ग्रामस्थ, नागरिक यांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


तलाठी प्रथमेश देसाई यांनी देखील वृक्षलागवडीचे पर्यावरणीय महत्त्व पटवून दिले. रामपूर ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक व सामाजिक कार्यकर्ते अमित वरपे यांनी पडीक जागा, शेताच्या बांधावर व गाव परिसरात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.या उपक्रमात शासनाचा 'वृक्षमित्र' पुरस्कार प्राप्त शिक्षक बाबुराव वरपे यांनी स्वतःच्या खर्चाने जांभूळ, आंबा, साग, फणस यासारखी उपयुक्त व स्थानिक रोपे उपलब्ध करून देत वृक्षलागवड मोहिमेला सक्रिय पाठबळ दिले.


कार्यक्रमास सेवा सोसायटीचे सचिव सुनिल देवण, सेवानिवृत्त शिक्षक रत्नाहार पाटील, राणबा ढेरे, दयानंद गावडे, गोपाळ देवण, धोंडीबा यादव, वसंत यरोळकर, अरविंद गावडे, नाना गावडे, उत्तम यरोळकर, पांडुरंग ढेरे, सागर घोळसे, यमणाप्पा वरपे, राजू वरपे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन बाबुराव वरपे यांनी केले.

Post a Comment

0 Comments