चंदगड, ता. १८ (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील माणगाव येथे श्री संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा होणार आहे. दिनांक १९ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२४ या दोन दिवसांत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्याची सुरुवात मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता मूर्ती अभिषेक व पूजनाने होईल. यानंतर दिवसभर अभिषेक, गंगापूजन, कासस पूजन, दिव्य पूजन, ध्वजपूजन, पताका पूजन यांसारखे धार्मिक विधी पार पडतील. तसेच विविध गावांतील मान्यवर भक्त, अधिकारी, कार्यकर्ते व संतसमाज प्रमुख यांच्या उपस्थितीत भक्तिगीत, प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत.
अखंड विना सेवा दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होऊन रात्री व पहाटेपर्यंत चालणार असून, यात माणगाव व पंचक्रोशीतील महिला व पुरुष भजनी मंडळांचा सक्रिय सहभाग असेल. संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत ह.भ.प. लक्ष्मण माणकोजी गडकरी यांचे प्रवचन होणार असून रात्री ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. नारायण ममदूम महाराज (आजऱा-धामणे) यांचे कीर्तन होणार आहे.
रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जागर भजन सेवा होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार, दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. नारायण ममदूम महाराज यांचे कीर्तन आयोजित आहे. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री संतसेना महाराज नाभिक समाज, माणगाव यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments