(डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून प्रेरणादायी उपक्रम)
चंदगड/प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जय भीम कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ, जेलुगडे आणि कोल्हापूरी शब्दसरी बहुउद्देशीय काव्य संस्था, जेलुगडे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शहाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पाटणे येथे यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची आवड निर्माण करणे, स्वतःचे ध्येय निश्चित करून यशाचे शिखर गाठण्यासाठी त्यांना प्रेरित करणे आणि भावी पिढीसाठी आदर्श घडवणे हा होता. यावेळी विद्यार्थ्यांना व मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. *विशेष गुणवत्ताधारक म्हणून कु. प्रणाली पांडूरंग बागवे हिला सामाजिक कार्यकर्ते अंकुश प्रधान यांच्याकडून रोख रक्कम १००० व ट्राॅपी देवून पाटणे रेंजर शितल बाजीराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
समाजात आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यासह विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी भाषण स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला जय भीम मंडळाचे कार्यकर्ते शिवाजी कांबळे, विजय कांबळे, परशराम कांबळे तसेच कोल्हापूरी शब्दसरी बहुउद्देशीय काव्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कवी, लेखक दशरथ (आण्णा) बाबू पाटील आणि उपाध्यक्ष,कवी , लेखक, गीतकार युवराज कृष्णा पाटील, धुमडेवाडी यांच्यासह गावातील मान्यवर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक नारायण लांडे यांनी कार्यक्रमातील सर्व मान्यवर, आयोजक मंडळ व उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणेचा संचार झाला असून “स्वप्न, संघर्ष आणि साध्य” या तत्त्वांचा अवलंब करून समाजातील प्रत्येक क्षेत्रात आपले गाव व देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा संदेश देण्यात आला.
Post a Comment
0 Comments