Type Here to Get Search Results !

बीएलओंच्या मानधनात दुप्पट वाढ,राज्य शासनाची मान्यता


(६ हजारांऐवजी १२ हजार रुपये मिळणार,भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य शासनाचा निर्णय,मतदार नोंदणी प्रक्रियेत बीएलओंच्या सेवेला सन्मान,वाढीव मानधन देऊन कामाचा गौरव)



मुंबई/प्रतिनिधी : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणीसाठी कार्यरत असलेल्या केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओंना (Booth Level Officer) आता दुप्पट मानधन मिळणार आहे. यापूर्वी बीएलओंना ६ हजार रुपये मानधन देण्यात येत होते; मात्र आता त्यांना थेट १२ हजार रुपये मानधन मिळणार आहे.


मतदार नोंदणी ही अखंड सुरू असलेली व जबाबदारीची प्रक्रिया आहे. गावोगावी जाऊन मतदारांची नावे नोंदवणे,त्यांचे दुरुस्ती अर्ज तपासणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे, विलोपन करणे, तसेच मतदार ओळखपत्र वाटप यांसारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या बीएलओंवर असतात. या सर्व कामाचे गांभीर्य ओळखून राज्य शासनाने मानधनात वाढ करण्यास मान्यता दिली आहे.


२०१९ साली शासनाने बीएलओंचे मानधन ६ हजार रुपये निश्चित केले होते. मात्र कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्या, नियमित फील्ड व्हिजिट्स आणि कार्यालयीन काम पाहता हे मानधन अपुरे ठरत होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या शिफारशीवरून राज्य शासनाने अखेर हा निर्णय घेतला आहे.


राज्य शासनाचा हा निर्णय जाहीर होताच बीएलओंमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दुप्पट मानधनामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीला काही प्रमाणात दिलासा मिळणार असून, मतदार नोंदणीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम व काटेकोरपणे पार पडेल अशी अपेक्षा आहे.हा निर्णय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जात असून, बीएलओंच्या मेहनतीला योग्य तो न्याय देणारा ठरला आहे.

Post a Comment

0 Comments