दौलत सहकारी साखर कारखान्याच्या देणीबाबत केडीसी बँकेच्या सभेत तीव्र चर्चा!
(अथर्व कंपनीने देणी न दिल्यास जिल्हा बँक पुढाकार घेणार-हसन मुश्रीफ यांचे आश्वासन,९ ऑक्टोबर रोजी लिलाव प्रक्रिया होऊ नये, सभासदांचा ठाम निर्धार)
कोल्हापूर/प्रतिनिधी : दौलत सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आल्यामुळे शेतकरी, कामगार व बँकेची थकलेली देणी तात्काळ द्यावीत, अशी मागणी माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील व ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.यावर प्रतिक्रिया देताना बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी, “अथर्व कंपनीने देणी फेडली नाहीत तर जिल्हा बँक पुढाकार घेऊन ती देणी भागवेल, कारखाना सहकारात टिकवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ,” असे स्पष्ट आश्वासन दिले.
२०१२ साली केडीसीसी बँकेने दौलत सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला होता. त्यानंतर २०१९ मध्ये अथर्व इंटरट्रेट प्रा. लि.ने हा कारखाना तब्बल ३९ वर्षांसाठी १६२ कोटी ४७ लाख रुपयांना भाडेपट्टीवर घेतला होता. करारानुसार शुगर डेव्हलपमेंट फंडची रक्कम, शेतकरी व कामगारांची देणी तसेच बँकेचे कर्ज फेडायचे होते. मात्र अथर्व कंपनीकडून देयकाची पूर्तता न झाल्यामुळे डेब्ट रिकव्हरी ट्रायब्युनलकडून (DRT) कारखाना व जमीन विक्रीची प्रक्रिया सुरू झाली असून ९ ऑक्टोबर रोजी लिलाव होणार आहे.
या पार्श्वभूमीवर सभासदांनी “कोणत्याही परिस्थितीत लिलाव होऊ देणार नाही” असा ठाम निर्धार व्यक्त केला. यावेळी चर्चेत सहभागी झालेल्या सदस्यांनी कारखान्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी बँकेने पुढाकार घेणे अत्यावश्यक असल्याचे मत मांडले.मुश्रीफ यांनी आश्वासन दिल्यानंतर सभासदांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले असले तरी ९ ऑक्टोबरच्या लिलावाची टांगती तलवार अजूनही कारखान्यावर आहे. त्यामुळे पुढील काही दिवस दौलत कारखान्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
Post a Comment
0 Comments