(वनविभागाची तात्काळ पाहणी; मृतकाच्या कुटुंबीयांना २५ लाखांची आर्थिक मदत मंजूर,शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन,वन्यप्राणी दिसताच वन विभागास कळवावे)
चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील कोकरे गावात रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी पुंडलिक बापू सुभेदार (वय ५६) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.दिनांक १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते ४.३० वाजण्याच्या दरम्यान सुभेदार हे रामेवाडी या ठिकाणी शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना चहा देण्यासाठी गेले होते. त्याचवेळी सरस्वती सिताराम सुतार यांच्या गट नं. २७ मधील उसातून अचानक एक रानगवा बाहेर येत त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात शिंग घुसल्याने श्री. सुभेदार गंभीर जखमी झाले.त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे दाखल करण्यात आले. परंतु दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे नेण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी तुषार गायकवाड, वनपाल कृष्णा डेळेकर, चंद्रकांत पावसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतकाच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वन केले.यानंतर १५ सप्टेंबर रोजी सहायक वनसंरक्षक विलास काळे यांनी कोकरे येथे जाऊन कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य जाहीर केले. मृतकाच्या पत्नी अनिता पुंडलिक सुभेदार यांच्या नावे तातडीने ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला असून एकूण २५ लाख रुपयांची मदत मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.श्री. धैर्यशील पाटील उपवनसंरक्षक कोल्हापूर यांनी तातडीने मृत व्यक्तीचे कुटुंबियांना 25 लाखाचे अर्थसहाय्य मंजूर केले.याप्रसंगी सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.वन विभागाकडून सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की, शेतात वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी तसेच शेतकाम करताना सतर्कता बाळगावी.


Post a Comment
0 Comments